बारामती : निवडणूक अर्जाला ‘एरर’चा फटका; थेट ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची इच्छुकांची मागणी

बारामती : निवडणूक अर्जाला ‘एरर’चा फटका; थेट ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची इच्छुकांची मागणी

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना बुधवारी (दि. 30) रोजी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध असलेली वेबसाईट सातत्याने बंद पडत असल्याने इच्छुकांची मोठी अडचण झाली. सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याची अडचण येत असल्याने थेट ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करून घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे.

बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांनाhttps:// mahasec. maharashtra. gov. in या वेबसाईटवर अर्ज भरावे लागत आहेत. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन हे काम करावे लागत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इतरांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज भरू, असे ठरविणार्‍या इच्छुकांपुढे ही वेबसाईट सातत्याने बंद पडत असल्याने आता मोठे संकट निर्माण झाले आहे. मंगळवारी अनेक इच्छुकांनी महा-ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी रात्र जागून काढली.

सरपंचपदाचा एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किमान दीड तासाचा वेळ लागतो. विविध विवरण पत्रांसह अनेक प्रतिज्ञापत्रे, विवाह नोंदणीची सत्यप्रत, गॅझेट, रहिवासी पुरावा, विविध हमीपत्रे, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र अशा अनेक किचकट बाबी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. ही सगळी प्रक्रियाच अत्यंत किचकट आहे. त्यामुळे सर्वच महा-ई-केंद्र चालकांना हे अर्ज भरून घेता येतील, अशीही परिस्थिती राहिलेली नाही. नियमित काम करणारे, हुशार केंद्र चालकच हे अर्ज भरू शकतात. त्यांनाही सध्या रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

उमेदवारी अर्ज भरताना डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागत आहे. चुकीची माहिती भरली, तर निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांची सर्व विवरणपत्रे, प्रतिज्ञापत्रे काढून पराभूत उमेदवार हमखास तक्रारी करतात. त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी प्रत्येक इच्छुक लक्ष घालत आहेत.

अर्ज दाखल होण्याबाबत धाकधूक वाढली
एकीकडे इंटरनेट सेवेचा बोजवारा उडतो आहे. तर, दुसरीकडे इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर वेबसाईट एरर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी तर दिवसातील अनेक तास ही वेबसाईट खुलीच होत नव्हती. त्यामुळे इच्छुकांची मोठी गैरसोय झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर ही आहे. परंतु, सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे आता अर्ज दाखल होतील
की नाही, अशी धाकधूक इच्छुकांना लागली आहे.

पोलिस भरती अर्जाला मुदतवाढीने गर्दीत भर
पोलिस भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जात अर्ज करावा लागत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनाही सर्व्हर डाऊनचा फटका बसला होता. राज्यभरातून तक्रारी गेल्यानंतर पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवून देण्यात आली. त्यामुळे एकाच महा-ई-सेवा केंद्रावर पोलिस भरतीचा अर्ज भरा, अशी विनवणी करणारे तरुण-तरुणी, तर दुसरीकडे ग्रामपंचायत इलेक्शन महत्त्वाचे आहे, आमचा अर्ज भरू द्या, अशी मागणी करणारे इच्छुक उमेदवार पाहायला मिळत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. विवरणपत्रे व प्रतिज्ञापत्रे काळजीपूर्वक भरावी लागत आहेत. त्यात वेबसाईट बंद पडत असल्याने रात्रीच्या वेळीसुद्धा महा-ई-सेवा केंद्र सुरू ठेवून ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यपदासाठी इच्छुकांचे अर्ज भरावे लागत आहेत. वेबसाईट बंद होण्याचे प्रकार घडत आहेत. ती पूर्ण क्षमतेने सुरू राहावी, अशी उपाययोजना करण्याची गरज आहे.

                                          प्रमोद पानसरे, महा-ई-केंद्र चालक, कोर्‍हाळे बुद्रुक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news