मंचर : कुत्र्याने परतवून लावला बिबट्याचा हल्ला | पुढारी

मंचर : कुत्र्याने परतवून लावला बिबट्याचा हल्ला

मंचर; पुढारी वृत्तसेवा : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे रविकरण महादेव डोंगरे यांच्या घराबाहेर असलेल्या जर्मन शेफर्ड या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास हल्ला केला. मात्र कुत्र्याने बिबट्याला प्रतिकार करत हल्ला परतवून लावला. हा सर्व प्रकार घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

चांडोली बुद्रुक येथील टायगरनगर येथे रविकरण महादेव डोंगरे यांच्या तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांनी घराचे राखण करण्यासाठी जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा पाळलेला आहे. सर्वजण घरात झोपले असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने जोरदार हल्ला केला. हल्ला होताच कुत्र्याने आवाज केल्याने घरातील सदस्य बाहेर आले.

त्यावेळी कुत्रा व बिबट्यामध्ये झटापट सुरू होती. त्यावेळी डोंगरे कुटुंबीयांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. दरम्यान या वस्तीवर बिबट्याचे वास्तव्य असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Back to top button