रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची भरभराट | पुढारी

रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची भरभराट

पुणे : ’कोरोना साथीच्या संकटानंतर पुण्यातील रिअल इस्टेटची बाजारपेठ भरभराटीला आली आहे. या शहराच्या सर्व भागांत पायाभूत सुविधांचा उत्तम प्रकारे विकास होत असल्याने या क्षेत्राच्या वाढीला त्यामुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. पुण्याची ही प्रगती पाहता येणारे दशक हे पुण्याचे असेल,’ असा विश्वास कोहिनूर समूहाचे सह व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल यांनी आज व्यक्त केला.

’इंडियन रिअल इस्टेट 2.0-स्केलिंग न्यू हाईट्स’ या विषयावरील परिसंवादाच्या उदघाटन सत्रात ते बोलत होते कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) आयोजित केलेल्या या दिवसभराच्या परिसंवादात या क्षेत्रातील विविध तज्ञांनी या क्षेत्राच्या अर्थकारणापासून पायाभूत सुविधा विकासापर्यंतच्या प्रगतीचे आणि आव्हानांचे विश्लेषण केले. यावेळी बोलतांना विनीत गोयल म्हणाले, ’पुण्यात वर्षाला साधारणतः 80 हजार अपार्टमेंटची विक्री होते.

पण कोरोनानंतरच्या अवघ्या 2 तिमाहीमध्ये 60 हजारांहून अधिक युनिटसची विक्री झाली आहे. पुण्यात सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आहेत. आयटी, शिक्षण, वाहन उद्योग आदींचे हब म्हणून हे शहर सर्वत्र ओळखले जाते. मेट्रो सुरु होत असल्याने त्याचाही लाभ या क्षेत्राला होईल. या क्षेत्राच्या प्रगतीला अनुकूल असे सर्व काही पुण्यात उपलब्ध असल्यामुळे भविष्यात त्याची मोठी वाढ झाल्याखेरीज राहणार नाही.’

सीआयआयचे (पुणे झोनल कौन्सिल) माजी अध्यक्ष आणि सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्ग यांनी, भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असून सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे, याकडे लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर 2030पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्र 1 लाख कोटी डॉलर्सपर्यंत जाईल आणि 2025पर्यंत त्याचे अर्थव्यवस्थेला असलेले योगदान जीडीपीच्या 13 टक्के असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रियल इस्टेट क्षेत्रासाठी स्मार्ट सिटी योजना ही मोठी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. सीबीआरई इंडियाच्या पुणे कामकाजाचे प्रमुख अनुज धोडी यांनी पुण्यातील गुंतवणूक वातावरण सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेंला चालना देणारा महत्वाचा घटक आहे. मात्र बांधकामाचा वाढता खर्च ही चिंतेची बाब आहे. पुण्यात पायाभूत सुविधा क्षेत्रातील 7 मोठ्या कंपन्या असल्यामुळे या सुविधांच्या विकासात हे शहर आघाडीवर आहे, याचा उल्लेख सीआयआय, आयजीबीसी पुणे चॅप्टरचे चेअरमन आणि श्रॉफ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश श्रॉफ यांनी केला.

डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंग, वर्कप्लेसेस या क्षेत्रातील नवीन आघाडीचे घटक कसे होऊ पाहत आहे, या सत्रात बोलताना कोहिनूर समुहाचे संचालक (कमर्शिअल) प्रशांत गोपीनाथ यांनी वर्कप्लेसेसमध्ये अधिक लवचिकता आणण्यावर भर दिला. भविष्यकाळात कामाची पद्धत हायब्रीड असेल, असे तज्ञांचे म्हणणे होते. एन्व्हायरॉन्मेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स (ईएसजी) यांचे या क्षेत्राटीक वाढते महत्व, यावरही एका सत्रात चर्चा झाली.

Back to top button