पिंपरी : आमच्या शेठला बारा वर्षांनी मुलगा झालाय..! | पुढारी

पिंपरी : आमच्या शेठला बारा वर्षांनी मुलगा झालाय..!

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आमच्या शेठला बारा वर्षांनी मुलगा झालाय, त्यामुळे आम्ही साड्या वाटप करतोय, चला तुम्हालाही साडी देतो, पण अंगावर असलेले सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे सांगून रस्त्याने जाणार्‍या महिलेला दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी हातचलाखीने दोन महिलांचे दागिने लंपास केले. दापोडी आणि दिघीरोड येथे हे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 75 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 29) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातचलाखीने काढले दागिने
वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दापोडी येथील विनीयार्ड चर्च समोरून जात होत्या. त्या वेळी चोरट्यांनी आपसात संगनमत करून ”आमच्या शेठला बारा वर्षांनी मुलगा झालाय, त्यामुळे ते गरीब लोकांना साडी वाटत आहेत, अशी बतावणी केली. तसेच, फिर्यादी महिलेला बाजूला नेऊन ”अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा, नाहीतर तुम्ही गरीब वाटणार नाही. त्यामुळे तुम्हाला साडी मिळणार नाही, असे सांगून अंगावरील दागिने काढण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने काढून ठेवलेले दागिने हातचलाखीने काढून घेत तेथून पळ काढला.

एका दिवशी दोन ठिकाणी घटना
या घटनेनंतर अशाच प्रकारे दिघी रोड, भोसरी येथे देखील एका महिलेचे दागिने चोरट्यांने पळवून नेल्याचे समोर आले. एकाच दिवशी दोन ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे पोलिसांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.

चोरट्यांच्या नवनवीन क्लृप्त्या
रस्त्याने जाणार्‍या गोरगरीब महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी चोरटे दररोज नवनवीन क्लृप्त्या शोधून काढत आहेत. दरम्यानच्या काळात पोलिस असल्याची बतावणी करून चोरटे पादचारी महिलांना लुटत होते. त्यावर पोलिसांनी वॉच ठेवण्यास सुरुवात केल्यानंतर आता चोरट्यांनी ही नवीन मोडस शोधून काढली आहे.

रस्त्याने जाणार्‍या कामगार महिलांना चोरटे अशा प्रकारे टार्गेट करीत आहेत. त्यामुळे महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्ती सांगत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवून कोणतीही कृती करू नये. तसेच, आपल्या आजूबाजूला काही संशयित आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलिसांना माहिती द्यावी.

                                                  – भास्कर जाधव,
                                             वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
                                                भोसरी पोलिस ठाणे

Back to top button