बँकेअभावी ग्रामस्थांची पायपीट, नाणे मावळातील नागरिकांना व्यवहारासाठी गाठावे लागते कामशेत | पुढारी

बँकेअभावी ग्रामस्थांची पायपीट, नाणे मावळातील नागरिकांना व्यवहारासाठी गाठावे लागते कामशेत

कामशेत, पुढारी वृत्तसेवा: नाणे मावळात कोणत्याची राष्ट्रीय किंवा सहकारी बँकेची शाखा नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बँकेशी संबंधित व्यवहार करण्यासाठी ग्रामस्थांना थेट कामशेत गाठावे लागत आहे. वीस, पंचवीस गावांचा भाग मिळूण नाणे मावळ बनलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने नाणे, कांब्रे गोवित्री, भाजगाव, सोमवडी, जांभिवली, शिरदे, उकसान, पालेनामा, साई, वाउंड, नाणोली, उंबरवाडी, मोरमारवाडी आदी गावे नाणे मावळात येतात. पण या गावातील व्यापारी व शेतकरी यांना बँकेशी संबंधित व्यवहार करण्यासाठी कामशेतला जावे लागत आहे.

बँक सुविधापासून नागरिक वंचित

नाणे मावळात राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक सहकारी बँकेची शाखा नाही. आंदर मावळ व पवन मावळात बँक सुविधा उपलब्ध आहे. पण नाणे मावळ परिसरात बँक नसल्याने नागरिकांना बँक सुविधापासून वंचित राहवे लागत आहे.

पैसे व वेळ खर्च

शेतकर्‍यांना शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा कर्ज यासाठी कामशेतला जावे लागत आहे. त्यासाठी वेळ व पैसा खर्च होतो. याशिवाय या भागात असणार्‍या शाळा, बालवाड्यांमधील शिक्षकांचे पगार, शाळांचे जमा होणारे अनुदान तसेच महिला बचत गटातील महिलांना कर्ज व पैसे जमा करण्यासाठी कामशेत गाठावे लागत आहे.

नाणे परिसरात कोणत्याही प्रकारची बँक नसल्यामुळे येथील पाटबंधारे विभागातील शासकीय कर्मचार्‍यांना बँकेत पैसे भरायला व काढण्यासाठी कामशेत येथे जावे लागते. तसेच, शेतकरी, पेन्शनधारक, शिक्षकांचे पगार, बचतगटातील सदस्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे आर्थिक खर्च होतो. तसेच, संपूर्ण दिवसही वाया जात आहे.
– सोमनाथ शिंदे, माजी उपसरपंच, उकसान

Back to top button