वेल्ह्यात 38 जनावरांना लम्पीची लागण | पुढारी

वेल्ह्यात 38 जनावरांना लम्पीची लागण

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  लम्पीची साथ रोखण्यासाठी देशभर युद्धपातळीवर जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. असे असले तरी वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण भागातील काही दुर्गम खेड्यातील गाई, बैल, वासरे अशी जनावरे या लसीकरणापासून वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. वेल्हे तालुक्यात आतापर्यंत 38 गाई, बैल, वासरे अशा जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. एका जनावराचा लम्पीने मृत्यू झाला आहे. तोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भोर्डी, सिंगापूर, हारपूड, खाणू आदी खेड्यात लम्पीची लागण झालेल्या 10 जनावरांवर सध्या वेल्हे तालुका पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत उपचार सुरू आहेत.

ही साथ रोखण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांची डोंगरदर्‍यात रात्रंदिवस धावपळ सुरू आहे. तर दुसरीकडे पानशेत धरण खोर्‍यात काही जनावरे लसीकरणापासून वंचित असल्याचा प्रकार पुढे आल्याने पशुवैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर पानशेत धरणाच्या शेवटच्या टोकाला रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील कुर्तवडी (ता. वेल्हे) येथे गाय, बैल, वासरे अशी 38 जनावरे आहेत. मात्र, एकाही जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस टोचण्यात आली नाही.

देशी गोवंशाचे संवर्धन
अलिकडच्या 15-20 वर्षांत वेल्हे तालुक्यात देशी गाई, बैलांची संख्या कमी झाली आहे. अधिक दूध देणार्‍या संकरित जातीच्या गाईंची संख्या 90 ते 95 टक्के आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम खेड्यात थोड्या फार प्रमाणात देशी गाई, बैल आहेत. सिंगापूर, दापसरे, घोल, कुर्डुवाडी, खाणू आदी खेड्यात-पाड्यात मोजकीच लोकसंख्या आहे. अनेक घरे माणसांअभावी बंद आहेत. ज्येष्ठ, वयोवृद्ध शेतकरी, महिला व अपवादात्मक तरुण आहेत. असे असले तरी शिवकाळापासून सुरू असलेला वडिलोपार्जित देशी पशुपालन व्यवसाय वयोवृध्दांनी जपला आहे. घोलचे माजी सरपंच पांडुरंग पोळेकर म्हणाले, पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून देशी गाई, बैल येथे सांभाळली जातात.

Back to top button