पिंपरी : अबब! तब्बल 12 लाखांचे उंदीर ; पालिकेकडून प्राणिसंग्रहालयातील सापांच्या खाद्यासाठी खर्च | पुढारी

पिंपरी : अबब! तब्बल 12 लाखांचे उंदीर ; पालिकेकडून प्राणिसंग्रहालयातील सापांच्या खाद्यासाठी खर्च

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर, चिंचवड येथील संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयास गेल्या सात वर्षांपासून टाळे आहे. असे असतानाही तेथील सापांसाठी खाद्य म्हणून पांढरे उंदिर दिले जातात. या मेजवानीचा खर्च तब्बल 12 लाख इतका आहे. महापालिकेचे शहरातील एकमेव असलेल्या प्राणिसंग्रहालयाचे सुशोभीकरण व नूतनीकरणासाठी गेल्या सात वर्षांपासून संथ गतीने काम सुरू आहे.

त्यामुळे प्राणिसंग्रहालय बंद आहे. परिणामी, पर्यटन बंद असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. त्याबाबत पुढारीने सातत्याने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, पशुवैद्यकीय, स्थापत्य, उद्यान, विद्युत आदी विभागात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्यावरून विरोधकांनी प्रशासन व सत्ताधारी भाजपवर टीकाही केली आहे.

प्राणिसंग्रहालय बंद असले तरी, तेथील सर्प, मगर, कासव व पक्षी अद्याप तेथेच पिंजर्‍यात ठेवण्यात आले आहेत. त्यांना दररोज खाद्य म्हणून भाजीपाला, फळे, मांस उंदीर असे पदार्थ दिले जातात. सापांना दररोज पांढरे उंदीर खाद्य म्हणून दिले जातात. उंदरे पुरविण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने 165 रूपये दराने निविदा काढली होती. त्यासाठी 3 निविदा प्राप्त झाल्या. त्यात सॅम एंटरप्रायजेसची दोन रूपये कमी दराची 163 रूपयांची निविदा पात्र ठरली. दोन वर्षांसाठी उंदराचा खर्च 11 लाख 73 हजार 600 रूपये इतका आहे. त्याला आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.

ताजा उंदीर नसल्यास प्रतिदिन 500 रुपये दंड

पांढरे उंदीर चांगल्या दर्जाचे व ताजे असावेत, अशी अट पशुवैद्यकीय विभागाने संबंधित पुरवठादारास घातली आहे. तसे नसल्यास ठेकेदारास प्रतिदिन 500 रुपये दंड केला जाणार आहे. उंदीर पुरविण्याचा कालावधी दोन वर्षे आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही.

एका सापाला आठवड्याला दोन उंदीर

प्राणिसंग्रहालयात विविध जातीचे एकूण 52 साप आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळा प्रत्येकी 2 पांढरे उंदीर खाद्य म्हणून देण्यात येतात. ठेकेदार उंदीर आणून देतात. तेथील पालिकेचे कर्मचारी ते सापांना आवश्यकतेनुसार देतात. पक्ष्यांना भाजीपाला देण्यात येतो. तर, मगर व इतर सपटणार्‍या प्राण्यांना चिकन दिले जाते.

Back to top button