

मिलिंद कांबळे :
पिंपरी : मुंबई शहरात गोवरचा उद्रेक सुरू झाल्यानंतर तत्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी घेऊन गोवर नियंत्रणात आणण्यासाठी तत्परतेने उपायोजना व कार्यवाही सुरू करणे गरजेचे होते; मात्र त्यात ढिलाई झाल्याने शहरात गोवर रुग्णांची संख्या काही भागांत हळहळू वाढत आहेत. पालिका रुग्णालय व दवाखान्यात येणार्या आजारी मुलांची आकडेवारी उपलब्ध असून, खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या मुलांची नोंदच नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबई शहरात गोवरचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यात काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यानंतर महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरात गोवर आजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक होते. शहरात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण मोहीम राबवून गोवरचे लसीकरण करण्याची गरज होती. मात्रपालिकेनेतातडीने दक्षता न घेता त्यात ढिलाई केल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालये व दवाखान्यांना त्याबाबत तातडीने सूचना दिल्या नाहीत. तसेच, शहरातील सर्व शाळांमध्ये विशेषत: प्राथमिक शाळेत दक्षता व खबरदारी घेण्याबाबत जनजागृती मोहीम राबविली नाही.
महापालिकेचा वैद्यकीय विभाग गाफील राहिल्याने आता शहरातील मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसत आहेत. त्या आजारी रूग्णांची संख्या शहरातील काही विशिष्ट भागात हळूहळू वाढत आहे. ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा आहे. दुसरीकडे, पालिका रूग्णालय व दवाखान्यांत उपचारासाठी दाखल झालेल्या मुलांची नोंद केली जाते. शहरातील खासगी रूग्णालय व दवाखान्यांतही गोवर आजाराचे मुले उपचार घेत आहेत. अशा आजारी मुलांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यात सुरू असलेल्या हिवाळ्यात थंडीत वाढल्याने सर्दी, खोकला, तापाचे रूग्णही वाढत आहेत.
गोवर व इतर आजारांचे रूग्णांची नोंद सर्वच खासगी रूग्णालय व दवाखान्यांतून पालिकेकडे कळविली जात नाही. त्यामुळे संपूर्ण शहरातील गोवर रूग्णांची ताजी आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे.
खासगी रुग्णालय व दवाखान्यांतील गोवर आजारी मुलांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागास कळविण्याच्या सूचना पालिकेने वायसीएम रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत दिल्या आहेत. त्या आजाराबाबत उपचार, लसीकरण आदींची माहिती दिली. त्याबाबत संघटनेच्या सर्व डॉक्टर सदस्यांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार, गोवरचे रुग्ण आढळल्यास पालिकेस कळविले जाते. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने या आजाराचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. थंडी वाढल्याने सर्दी, खोकला व तापाचे प्रमाण मुलांमध्ये वाढत अहे. ती बाब सामान्य आहे. प्रवास करून आलेले किंवा स्थलांतरीत मुलांना ताप आल्याने तसेच, लस न घेतल्याने हा आजार होत आहे. नऊ महिने ते 15 वर्षांच्या बालकांनी एका महिन्याच्या अंतराने गोवरचे दोन डोस घ्यावेत, असे निमा संघटनेचे शहराध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी यांनी सांगितले