

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. एकूण 29 उमेदवारांनी 39 अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी काँग्रेसचे बंडखोर बाळासाहेब दाभेकर, हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत 29 उमेदवारांचे 39 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत संपल्याने अनेक उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला.
बुधवारी नामनिर्देशन अर्जांची छाननी होणार असून, 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे यांनी दिली. कसबा विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारी भाजपतर्फे हेमंत रासने आणि गणेश बीडकर, तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे रवींद्र धंगेकर यांनी दोन नामनिर्देशन अर्ज भरले आहेत. हिंदू महासंघातर्फे आनंद दवे यांनी, तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांनी देखील काँग्रेस पक्षातर्फे एक नामनिर्देशन अर्ज आणि अपक्ष अर्ज दाखल केल्याने कोणता अर्ज ग्राह्य धरला जाणार किंवा कोणता माघारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आम आदमी पक्षाकडून किरण कद्रे यांनीदेखील नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल केलेले उमेदवार
हेमंत रासने (भाजप) 4, गणेश बीडकर (भाजप) 1, रवींद्र धंगेकर (काँग्रेस) 2, बाळासाहेब दाभेकर (काँग्रेस), अविनाश मोहिते (संभाजी बि—गेड) 2, सलीम सय्यद (अपक्ष) 2, अमोल तुजारे (अपक्ष) 2, तुकाराम धपाळ (सैनिक समाज पार्टी), इम्तियाज तांबोळी (अपक्ष) 2, खिशाल जाफरी (अपक्ष) 2, बलजित सिंग कोचर (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), तर अपक्ष अर्ज भरणार्यांमधून चंद्रकांत मोटे, मिलिंद कांबळे, महेश म्हस्के, गणेश बढाई, रवींद्र वेदपाठक, अपर्णा साठे, हुसेन शेख, सुरेशकुमार ओसवाल, बाळासाहेब दाभेकर, अनिल हट्टागळे, विशाल नगराळ, अभिजित बिचुकले, आनंद दवे, रियाज सय्यद, अजित इंगळे, सचिन धनगुडे, इमरान शेख, संतोष चौधरी असे एकूण 29 उमेदवारांनी 39 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.