पुणे: दौंडचा फरारी ‘बादशाह’ अखेर पोलीसांच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषणने राजस्थानात केले जेरबंद | पुढारी

पुणे: दौंडचा फरारी 'बादशाह' अखेर पोलीसांच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषणने राजस्थानात केले जेरबंद

दौंड, पुढारी वृत्तसेवा: दौंड नगरपालिकेचा फरार माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख याला जिल्हा पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने राजस्थानमध्ये अजमेर येथे जेरबंद केले आहे.

दौंड शहरात दोन कुटुंबामध्ये मोठी हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी एका मागासवर्गीय कुटुंबाची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली होती. या कुटुंबाने अत्यंत वरिष्ठ पातळीवरून हालचाल केल्याने बादशहा शेख आणि इतरांविरोधात दलित अत्याचार विरोधी कायदा (ॲट्रोसिटी), जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात बादशाह शेख व त्याचे साथीदार फरार झाले होते. यातील चार जणांना यापूर्वीच अटक केली आहे.

बादशाह शेख याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बारामती सत्र न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला. तेव्हापासून बादशाह शेख याला शोधण्याकरता पोलिसांनी दोन पथके पाठवली होती. या पथकांनी बादशाह शेखला राजस्थानमधून ताब्यात घेतले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, सहाय्यक निरीक्षक काळे, हवालदार सचिन घाडगे यांच्या पथकाने शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Back to top button