पुणे: जेसीबी यंत्रच उभे करणार ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारात, ओतूरमध्ये होणार अनोखे आंदोलन | पुढारी

पुणे: जेसीबी यंत्रच उभे करणार ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारात, ओतूरमध्ये होणार अनोखे आंदोलन

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: जेसीबी यंत्राच्या सहाय्याने केलेल्या कामाचे पैसे वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात मागणी करूनही ओतूर ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जेसीबी मालक चैताली जालिंदर पानसरे यांनी ओतूर ग्रामसचिवालयाच्या इमारतीसमोरील प्रवेशद्वारात अवाढव्य असलेले जेसीबी यंत्र उभे करून आत जाण्या-येण्याचा मार्ग रोखून अनोखे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत कामाचे पैसे अदा केले जाणार नाहीत, तोपर्यंत जेसीबी मशीन प्रवेश द्वारातून हलविणार नसल्याचे पानसरे यांनी सांगितले आहे.

हे अनोखे आंदोलन गुरुवारी (दि. १ डिसेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास होत आहे. ओतूर ग्रामपंचायतीकडे चैताली पानसरे यांचे जेसीबी यंत्राने केलेल्या कामाचे एकूण रक्कम १ लाख ३८ हजार २५० रुपये इतके येणे बाकी असल्याचे आंदोलन पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच आंदोलन करीत असलेल्या पत्राच्या प्रति जुन्नरचे तहसीलदार व ओतूर पोलिस ठाण्यात देण्यात आल्या आहेत.

ग्रामसेवक वणघरे फोनच उचलत नाहीत

ओतूर ग्रामपंचायतीसंबधी काही माहिती घ्यायची असली तर ग्रामसेवकांना फोन केला केला जातो. मात्र ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून गत महिनाभरात त्यांनी एकही फोन उचलेला नाही व फोन कट केला जात आहे.

Back to top button