पिंपरी : भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी : भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी : महापालिकेचे सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी गैरमार्गाचा वापर करीत पदोन्नती मिळविली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्ट मार्गाचा वापर करीत मोठी संपत्ती जमा केली आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तक्रारीची दखल न घेतल्याने भारतीय रिपब्लिकन मायनॉरीटीज फेडरेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली आहे. क्षेत्रीय अधिकारी बोदडे यांनी नियम धाब्यावर बसवून कोट्यवधीची संपत्ती जमा केली आहे. महापालिकेचे म्हणजे शासकीय अधिकारी असताना ही त्यांनी आपले मित्रमंडळी व नातेवाईकांना ठेके मिळवून दिले आहेत.

आंदोलनाचा दिला इशारा

'क' क्षेत्रीय कार्यालयात ते क्षेत्रीय अधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. तेथे ते ठेकेदार, बिल्डर लॉबी व राजकीय नेतेमंडळींच्या सोईस्कर अशी भूमिका घेतात. झोनिपू विभागातही त्यांनी बोगस कागपत्रांच्या आधारे पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना घरे दिली. क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना ते पाठीशी घालत आहेत, असा आरोप खान यांनी केला आहे.

40 लाखांच्या अपहाराचा आरोप

माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असताना त्यांनी महापालिकेची स्वच्छता संदर्भातील जाहिरात राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याचे खोटेच दाखवत सुमारे 40 लाखांचा अपहार केला होता. त्याबाबत तत्कालिन विभागप्रमुखांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, राजकीय नेतेमंडळीचा दबावाचा वापर करीत बोदडे यांनी ते प्रकरण दाबले, असा आरोप खान यांनी केला आहे.

काही जण विनाकारण माझ्याबाबत तक्रार करतात. अशा तक्रारींमागे दबावतंत्राचा भाग असू शकतो.
– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त

मी नव्यानेच सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. तक्रार आली असेल, त्याबाबत शहानिशा करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news