मंचर : दागिने चोरणार्‍या तीन भोंदूबाबांना अटक | पुढारी

मंचर : दागिने चोरणार्‍या तीन भोंदूबाबांना अटक

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  साल (ता. आंबेगाव) येथील अनिता बाळासाहेब गव्हाणे यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तीन अनोळखी व्यक्तींनी हातचलाखी करून चोरून नेले होते. याबाबतची फिर्याद घोडेगाव पोलिसात दाखल झाली होती. घोडेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत यातील तीन भोंदूबाबांना श्रीगोंदा तालुक्यातून अटक केली. घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 25) अनिता गव्हाणे (वय 43) या आजारी असल्याने घरात होत्या.

त्यावेळी त्यांच्या घरी पायजमा शर्ट, गळ्यात कवड्याची माळा असलेले तीन अनोळखी इसम आले. त्यांनी गव्हाणे यांना टाचेचे व मणक्याचे दुखणे बरे करून देतो असे सांगून त्यासाठी तुमचे दागिने पुजावे लागतील असे सांगितले. गव्हाणे यांनी मंगळसूत्र व हातातील कडे पुडीत बांधून देवापुढे ठेवले. त्यानंतर ते इसम निघून गेले. गव्हाणे यांना संशय आल्याने त्यांनी पुडी उघडली असता ती रिकामी होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घोडेगाव ठाण्यात फिर्याद दिली.

घोडेगाव पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिकदृष्ट्या तपास करून श्रीगोंदा व काष्टी (जि. अहमदनगर) येथून तीन आरोपींना अटक केली. नाना राघू सावंत (रा. देव पैठण, ता. श्रीगोंदा), सुरेश भिकाजी सावंत (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), दत्ता उत्तम शिंदे (रा. काष्टी, आमदारमळा, ता. श्रीगोंदा) अशी त्यांची नावे आहेत.  सदर कारवाई घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, उपनिरीक्षक सतीश डोले, उपनिरीक्षक नवनाथ वायाळ, पोलिस जवान अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, रवींद्र सुरकुले, संगीता मधे, नामदेव डेंगळे, बाळासाहेब सावंत, माणिक मुळूक यांनी केली.

Back to top button