वाल्हे परिसरात ज्वारीचा पेरा घटला | पुढारी

वाल्हे परिसरात ज्वारीचा पेरा घटला

वाल्हे : ज्वारी उत्पादनात पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसर आघाडीवर असतो. मागील अनेक दशकांपासून ज्वारीचे मोठे उत्पादन या परिसरात घेतले जाते. दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो. मात्र, यंदा रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा घटला आहे.  दरवर्षी रब्बीचा पेरा साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. मात्र, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सलग 15 ते 20 दिवस पाऊस सुरू होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढणीला उशीर झाल्याने, ज्वारीच्या पेरण्या एक महिना उशिरा सुरू कराव्या लागल्या. त्यामुळे ज्वारीचा पेरा जवळपास 14 टक्क्यांनी कमी झाला आहे. परिणामी ज्वारीच्या उत्पादनात घट होणार आहे.

वाल्हे परिसरातील जिरायती व बागायती मिळून 958 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाल्याचा अहवाल आहे. मागील वर्षी 1113 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. मागील वर्षापेक्षा या वर्षी ज्वारीच्या पे-यांत एकूण 155 हेक्टरने घट झाली आहे.
दर वर्षीपेक्षा चालू वर्षी ऊस व भाजीपाला लागवडीकडे शेतकरीवर्ग जास्त प्रमाणात वळला आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक गीता पवार, मयूरी नेवसे यांनी दिली.

दरम्यान या वर्षी ज्वारीचा पेरा घटल्याने व कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता आहे. तसेच, कडब्याच्या कमतरतेमुळे कडबासुद्धा भाव खाण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

27 नोव्हेंबरअखेरचा पेरणी अहवाल
? गहू – 74 हेक्टर
? हरभरा – 50 हेक्टर
? कांदा – 73 हेक्टर
? ऊस – 30 हेक्टर
? भाजीपाला – 38 हेक्टर

मागील तीन वर्षांतील ज्वारी पेरणीचा हेक्टरी अहवाल
? 2019 – 1239 हेक्टर
? 2020 – 1037 हेक्टर
? 2021 – 1113 हेक्टर
? 2022 – 958 हेक्टर

Back to top button