रक्त चाचणीतून होऊ शकते कर्करोगाचे निदान ; डॉ. जयंत खंदारे यांचे संशोधन | पुढारी

रक्त चाचणीतून होऊ शकते कर्करोगाचे निदान ; डॉ. जयंत खंदारे यांचे संशोधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कर्करोगबाधित रुग्णांच्या रक्तातून सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्सना टिपणारी ऑन्कोडिस्कव्हर ही रक्त चाचणी डॉ. जयंत खंदारे यांनी विकसित केली आहे. भारतातील अशा प्रकारची पहिली रक्तचाचणी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुणे आणि मुंबईत गेली 15 वर्षे याबाबत संशोधन केले.  डॉ. खंदारे यांना संशोधन कार्यासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे सहकार्य मिळाले. संशोधन समाजाभिमुख व्हावे, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने ही कर्करोग निदान चाचणी समजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. खंदारे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. खंदारे यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (एनसीएल) पीएचडी पूर्ण केली आहे. अमेरिकेतून तीन पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप आणि जर्मनीतील अ‍ॅलेक्झांडर वॉन हम्बोल्ड एक्सपिरियन्स्ड (एव्हीएच) फेलोशिप मिळवली आहे. त्यांचे शंभरहून अधिक प्रबंध आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

काय आहे चाचणी?

सध्या भारतामध्ये 50-60 लाख कर्करोगाचे रुग्ण आहेत. कॅन्सर सेल फिल्टरेशन तंत्रज्ञानावर आधारित एका उपकरणाद्वारे रुग्णाच्या रक्तातून कर्करोगाच्या पेशी वेगळ्या करणे शक्य होते. कर्करोगाच्या पेशी रक्तामधून स्थलांतरित होतात व त्याद्वारे कर्करोगाचा प्रसार होतो. कर्करोगबाधित लोकांपैकी 90 टक्के रुग्ण हे कॅन्सर मेटासिसचे निदान लवकर न झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. कॅन्सर मेटासिसचे निदान होण्याची मर्यादा कमी असल्यामुळे, पेट किंवा एमआरआय चाचणीमध्ये अशा पेशींचे अस्तित्वच लक्षात येत नाही व कर्करोगाचा प्रसार शरीरात जलदगतीने होत राहतो. ऑन्कोडिस्कव्हर टेस्ट ही ’फर्स्ट इन क्लास’ लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानाधारित चाचणी असून त्याच्या यशस्वी वैद्यकीय चाचण्या मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे झाल्या आहेत. नव्याने आलेल्या मेडिकल डिव्हाईसेस रूल्स 2017 अंतर्गत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) या संस्थेने उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता दिलेले भारतातील हे प्रथम आणि एकमेव स्वदेशी वैद्यकीय उपकरण आहे. एफडीए महाराष्ट्र यांनी या कार्यासाठी भरीव मदत केली आहे.

अशा स्वरूपाची चाचणी 2004 पासून अमेरिकेमध्ये

1.4 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. भारतामध्ये संशोधन करून आम्ही ही किंमत पंधरा हजार रुपयांपर्यंत खाली आणली असून अचूकता आणि संवेदनशीलता यामध्ये कोठेही तडजोड केलेली नाही. आमच्या चाचणीसाठी सुमारे 48 तासांचा कालावधी लागतो. परदेशात चाचणीसाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो.
                                                                              – डॉ. जयंत खंदारे

Back to top button