

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी मार्केट यार्डात उभारण्यात आलेल्या बेकायदा शेडसाठी अडत्यांच्या नेत्यांनीच अडत्यांचा खिसा कापल्याची जोरदार चर्चा बाजारात सुरू आहे. अडत्यांच्या दोन गटांपैकी एका गटाने प्रतिगाळा शेडसाठी 26 हजार तर, दुसर्या गटाने 30 हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. सुमारे सातशे गाळ्यांच्या शेड बांधकामासाठी सुमारे 2 कोटी 2 लाख रुपये खर्च आला असून यामध्ये 550 गाळेधारकांकडून प्रत्येकी 4 हजारप्रमाणे 22 लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याने अडतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे, तरकारी व कांदा- बटाटा विभागात अडत्यांनी प्रशासनाच्या परवानगीशिवाय परस्पर अवैध बांधकामे केली आहेत.
दोन-तीन महिन्यांपूर्वी फळे, तरकारी व कांदा-बटाटा विभागात गाळ्यांसमोर बेकायदा शेड बांधली गेली. गाळ्यांसमोर बेकायदा शेड बांधण्यासाठी अडत्यांच्या एका गटाने सुमारे 550 गाळेधारकांकडून प्रत्येकी 30 हजार रुपये घेतले. तर दुसर्या गटाने सुमारे 200 गाळेधारकांकडून प्रत्येकी 26 हजार रुपये घेतले. एकाच दर्जाच्या, एकाचवेळी एकसारख्या कामासाठी वेगवेगळ्या रक्कम घेतल्याने अडत्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. सर्व ठिकाणी एकसारखेच शेड उभारले जात असताना एका गटाने प्रतिशेड 4 हजार रुपये जास्त घेतले. त्यामुळे, प्रशासनाच्या नावाखाली नेतेमंडळींनीच आपला खिसा कापल्याची भावना जास्त पैसे घेतलेल्या अडत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
गुलटेकडी मार्केट यार्डात अडतदारांनी कोणाच्याही परवानगीशिवाय परस्पसर अवैध बांधकामे केली आहेत. गेट क्रमांक 4 लगत दोन पाकळ्या उभारत सुमारे 97 गाळे बांधले. ते गाळे 50 ते 52 जणांच्याच ताब्यात आहेत. कांदा विभागात सुमारे 35 गाळे अवैध बांधले आहेत. गेट क्रमांक चारलगत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पक्की बांधकामे उभारली आहेत. सुमारे अडीच एकर क्षेत्रावर अवैध बांधकामे झाली आहेत. खासगी खर्चातून बांधकामे करून ठराविक व्यापारी यांनी संबंधित जागांवर ताबा मिळवला आहे.