पुणे : अधिसभेच्या प्राचार्य गटासाठी 95 टक्के मतदान | पुढारी

पुणे : अधिसभेच्या प्राचार्य गटासाठी 95 टक्के मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य गटातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित पाच जागांसाठी रविवारी पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतील तीन ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये 298 प्राचार्यांपैकी 284 प्राचार्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाचा टक्का 95 टक्के होता. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिसभेत प्राचार्य गटाच्या एकूण दहा जागा आहेत.

त्यातील खुला प्रवर्ग वगळता आरक्षित प्रवर्गातील पाच जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. एस. टी. प्रवर्गाची जागा रिक्त राहिली आहे. एस. सी. प्रवर्गातून डॉ. देविदास वायदंडे, ओबीसी प्रवर्गातून डॉ. वैभव दीक्षित, एन. टी. प्रवर्गातून डॉ. गजानन खराटे, तर महिला प्रवर्गातून डॉ. क्रांती देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. खुल्या प्रवर्गातील उर्वरित पाच जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यातील मतदारांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील पर्यावरणशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. या ठिकाणी 144 पुरुष आणि 28 महिला, अशा एकूण 172 प्राचार्यांनी मतदान केले.

उद्या होणार मतमोजणी…

विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी (दि. 29) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्या वेळी उमेदवार स्वतः किंवा उमेदवाराने लेखी अधिकारपत्र दिलेले त्याच मतदारयादीतील मतदार असणार्‍या त्यांच्या प्रतिनिधींना किमान एक तास अगोदर ओळखपत्र दाखवून हजर राहता येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Back to top button