दहावी-बारावी परीक्षा होणार कडक! | पुढारी

दहावी-बारावी परीक्षा होणार कडक!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यंदा पहिल्या सत्रातील पेपरसाठी साडेदहानंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात सोडण्यात येणार नाही. तसेच शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ आदी सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणारी दहावी-बारावीची परीक्षा कडकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे दहावी-बारावी परीक्षेत काही प्रमाणात शिथिलता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास फारशा अडचणी आल्या नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे दहावी-बारावीतील उत्तीर्णांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचबरोबर परीक्षेला हजर राहण्याच्या वेळेच्या शिथिलतेमुळे परीक्षेतील गैरप्रकार तसेच पेपर  समाजमाध्यमावर व्हायरल होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा परीक्षेच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याच्या वेळेत सवलत दिली जाणार नाही.

राज्य मंडळामार्फत 2022 च्या परीक्षेमध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामाचा विचार करून अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला होता. तसेच शाळा तिथेच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा झाला आहे. त्यामुळे शाळा तिथे परीक्षा केंद्र न ठेवता जवळच्या शाळेत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेसाठी देण्यात आलेला वाढीव वेळ रद्द करून पूर्वीप्रमाणेच वेळ निश्चित करण्यात आली आहे. 2023 ची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर ठेवण्यात येणार असल्याचे देखील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button