पिंपरी : परदेशात निघाले, पोलिस क्लिअरन्स काढले का? | पुढारी

पिंपरी : परदेशात निघाले, पोलिस क्लिअरन्स काढले का?

राहुल हातोले : 

पिंपरी : परदेशात जाण्याचा आपण काही प्लॅन करत असाल, तर अमेरिकेसारख्या देशांनी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी आपण संबंधित प्रमाणपत्र पोलिसांकडून मिळविले आहे का? आता हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांचा पुण्यातील मुंढवा येथे जाण्याऐवजी पिंपरी पोस्ट कार्यालयातच सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या देशांनी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना या देशांमध्ये जाण्यासाठी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंढव्यातील कार्यालय गाठावे लागत होते. मात्र, गेल्या महिन्यापासून पिंपरी पोस्ट कार्यालतयातील पासपोर्ट विभागाने आता येथेच ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

पासपोर्ट काढण्याचे दर : 
नव्याने अर्ज करणारे बालक – 900 ते 1000
नव्याने अर्ज करणारे तरुण – 1500
नव्याने अर्ज करणारे ज्येष्ठ – 1350
नूतनीकरणासाठी अर्ज करणारे – 1500
पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी 500 रुपये अतिरिक्त भरावे लागतात.

गेल्या महिन्यापासून पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटची प्रक्रिया पिंपरी विभागामधून सुरू केली आहे. अद्यापपर्यंत 150 हून अधिक प्रमाणपत्र नागरिकांना देण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबली आहे.
                                        – एस. आर. लोहकरे, पोस्ट मास्तर, पिंपरी

काय आहे पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच पोलिस मंजुरी प्रमाणपत्र. पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येते. त्यानंतरच नागरिकांच्या हाती पासपोर्ट मिळतो व व्हिसा मिळवून परदेशात जाता येते; मात्र अमेरिकेसारख्या देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसासह पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटदेखील वेगळे काढावे लागते.

Back to top button