सुषमा नेहरकर-शिंदे :
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच जिल्हा नियोजन समितीच्या तब्बल 875 कोटी रुपयांच्या कामांच्या यादीला मान्यता दिली आहे. सध्या तालुक्यात, मतदारसंघात गावांसाठी मंजूर झालेला निधी 'मीच मंजूर करून आणला' असल्याचा श्रेयवाद घेण्यासाठी आमदारांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच ते सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्यामध्ये जोरदार चढाओढ सुरू झाली आहे.
यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार विरुद्ध भाजप- शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असा सामना सध्या ग्रामीण भागात सर्वच तालुक्यात रंगला आहे. प्रत्येक जण आपण किती निधी मंजूर करून आणला याबाबत पत्रकार परिषदा, सोशल मीडिया, पत्रके वाटप करून सांगत सुटले आहेत. यामुळे सध्या तरी ग्रामीण भागाचा निधी व विकास राज्यकर्त्यांच्या श्रेयवादात अडकल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहे.
भाजपचे नेते व पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यातील कामांना मोठ्या प्रमाणात कट लावत सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचा प्रयत्न करत नव्याने कामांना मंजुरी दिली. दोन दिवसांपूर्वी सर्व कामांच्या याद्या मंजूर करून प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु त्यानंतर जिल्ह्यात सर्व तालुक्यात मंजूर झालेला निधी आपणच मंजूर करून आणला असल्याचा केविलवाणा प्रयत्न प्रत्येकाचा सुरू आहे.
जुन्नर तालुक्यात आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आणि शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे तिघांनी पत्रकार परिषद घेऊन आपण निधी मंजूर करून आणल्याचे जाहीर केले. एकच काम तीन नेत्यांनी मंजूर केल्याने लोकांमध्ये संभ—म निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती खेड, आंबेगाव, मावळ, शिरूर, इंदापूरसह अन्य सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. सर्व आमदारांनी आपल्या विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर, फेसबुक पेजसह सर्व सोशल मीडियावर व अनेक ठिकाणी जाहीरपणे पत्रके वाटून तालुक्यासाठी किती मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याचे दाखवत आहेत. यामुळे भाजप- शिंदे गटाचे नेते, कार्यकर्त्यांची मात्र मोठी गोची झाली असून, यासंदर्भात थेट पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदारांच्या निधीला कट लावण्यात आला आहे. काहीच तालुक्यांना मनमानी पध्दतीने वाटप झालेल्या निधीला कट लावत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना प्रत्येकी केवळ तीन कोटींचा निधी देण्यात आला असून, या आमदारांना केवळ तेवढ्याच कामांचे श्रेय घेता येणार असल्याची भूमिका भाजपच्या नेत्यांची आहे.
-शरद बुट्टे पाटील, भाजप नेते व जिल्हा परिषद गटनेते
पालकमंत्र्यांच्या सहीचे पत्र मिळणार
जिल्हा नियोजन समितीची पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कामे नव्याने व भाजप, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानुसार मंजूर केली आहेत. परंतु सध्या तालुक्यासाठी मंजूर झालेली सर्व कामे आपण मंजूर करून घेतली असल्याचा आव राष्ट्रवादीचे आमदार आणत आहेत. आता जिल्ह्यातील सर्व भाजप व शिंदे गटाच्या नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी सुचवलेल्या व मंजूर करण्यात आलेल्या कामांचे पालकमंत्र्यांच्या सहीचे लेखी पत्र व कामाचे आदेशांचे देखील वाटप करण्यात येणार आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.