

वडगाव मावळ : आंदर मावळ भागातील कोंडिवडे येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची उत्तराखंड येथून सुटका करण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली. ॠषिकेश शरद गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी अपहृत मुलीच्या (निर्भया) वडिलांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निर्भयाचे वडील हे उर्दनिर्वाहासाठी मुंबई येथे राहत असून ती त्यांचे मूळगावी कोंडिवडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे आपले वयोवृद्ध आजीकडे राहून शिक्षण घेत आहे.
10 नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजणेचे सुमारास निर्भयाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची फिर्याद निर्भयाचे वडिलांनी दिली व आरोपी ॠषिकेश गायकवाड यानेच तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केलेला होता.
संशयित आरोपीच्या घरी जाऊन त्याचे नातेवाइकांकडे तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये चौकशी केली असता, संशयित आरोपी हासुद्धा घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वडगाव मावळ पोलिसांनी लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला.
पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी अपहृत निर्भया व संशयित आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले असता, पीडित बालिका ही संशयित आरोपीचे बरोबर असल्याचे दिसून आले. आरोपीने तिला लोणावळा मार्गे ठाणे व तेथून पुढे हरिद्वार, उत्तराखंड येथे घेऊन गेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक भोसले यांनी तात्काळ सहायक निरीक्षक संतोष जाधव, पोलिस हवालदार सचिन काळे, महिला हवालदार निर्मला उप्पु, पोलिस कर्मचारी शशिकांत खोपडे यांचे पथक उत्तराखंड राज्यामध्ये रवाना केले. पोलिस पथक उत्तराखंड येथे दाखल झाल्यानंतर या पथकाला नवीन प्रदेश व भाषेमुळे निर्भयाचे शोधकार्यामध्ये अडचण निर्माण होऊ लागली. त्या वेळी सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उत्तराखंड राज्यातील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर घोडके यांना फोन करून पथकांस योग्य ते सहाय्य करणेबाबत विनंती केली.
त्यानंतर कोतवाली पोलिस ठाणे, हरिद्वार उत्तराखंड येथील पोलिस पथकाने वडगाव मावळ पोलिस पथकांसबरोबर घेऊन मोबाईल टॉवर लोकेशनवरून निर्भया व आरोपीचे शोधकार्य चालू केले असता, एका लॉजमध्ये निर्भया व आरोपी मिळून आले.
मोबाईल फोनवर समाजमाध्यमाद्वारे अनोळखी व्यक्तींची ओळख होऊन त्यातून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन बालिकांना फूस लावून पळवून नेणेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत जागृत होऊन अल्पवयीन मुलांचे मोबाईल फोन वापरावर देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
-विलास भोसले, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ