कुरकुंभ : केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत : सुप्रिया सुळे | पुढारी

कुरकुंभ : केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत : सुप्रिया सुळे

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. देशात महागाई वाढली आहे. दुधावर जीएसटी लावणारे हे सरकार आहे. अन्नावरील जीएसटी बंद करावा. जीएसटी कर शेतकर्‍यांना मिळाला तर ठीक आहे. मात्र, हा सर्व कर सरकारला मिळत आहे, असे प्रतिपादन बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. बुधवारी (दि. 23) खा. सुळे दौंड तालुक्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. या वेळी त्यांनी जिरेगाव व कौठडी येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, हे सरकार आल्यापासून ते स्वत:ची खुर्ची वाचविण्यात मग्न आहे. यांचे नाते कुठल्याही सर्वसामान्य मायबाप जनतेशी नसून फक्त मतांशी आहे. शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. कौठडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घर व गावापासून शाळेपर्यंत बसची सोय तसेच इतर सुविधा व विकासकामे अडचणी, समस्या, यावर चर्चा करण्यात आली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद माजी सदस्या सारिका पानसरे, महिला तालुकाध्यक्षा योगिनी दिवेकर, युवानेते गणेश थोरात, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे, नेते नितीन शितोळे, जिरेगाव सरपंच भरत खोमणे, कौठडी सरपंच जयश्री मेरगळ व पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.

Back to top button