पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विजेच्या वाढत्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने 84 इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून 3 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे, याकामी 14 कोटी 44 लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 7 निविदा काढण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या 7 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामध्ये अ, ब, क, ई, फ, ग आणि ह आदी क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतीच्या छतावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याशिवाय, प्रमुख शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, रुग्णालये, ग्रंथालय, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, अग्निशामक केंद्र आदींच्या छतावर ही सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही सौरऊर्जेमुळे अडचण जाणवणार नाही.
सौरऊर्जा उभारणीसाठी केलेला खर्च पुढील चार वर्षांत भरून निघेल.
रुफ टॉप सोलरचे आयुष्य 25 वर्षे असेल. त्यामुळे त्यावरील खर्चात बचत होईल.
महापालिका मालकीच्या इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी काढण्यात आलेल्या 4 निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर, 3 फेरनिविदा मागविल्या आहेत. निविदा कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यादेश दिलेल्या तारखेपासून पुढील सहा ते आठ महिन्यांत ही यंत्रणा बसविण्यात येईल.
-बाबासाहेब गलबले, सह-शहर अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.