पुणे : महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक; रेल्वे डब्याची काच फुटली | पुढारी

पुणे : महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक; रेल्वे डब्याची काच फुटली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर रेल्वेच्या पुणे विभागात उरुळी कांचन येथे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 11040 गोंदियाहून सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुणे विभागात येते आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत धावते. शुक्रवारी सायंकाळी ही गाडी पुणे विभागात दाखल झाली. उरुळी स्थानक परिसर येताच या गाडीवर अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची स्थानिक रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, त्यांना दगडफेक झालेल्या ठिकाणी कोणीही सापडले नाही. या संदर्भात एका प्रवाशांने रेल्वे प्रशासनाला तक्रार केली होती. रेल्वेवर दगडफेक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या आठवड्यातच सिंहगड एक्सप्रेसवर कर्जत जवळ दगडफेकीची घटना घडली होती.

त्या घटनेत एक तरुण प्रवासी चांगलाच जखमी झाला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी दुसरी दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आहे का, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. यासोबतच दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Back to top button