पिंपरी : शहरात गोवरचे 5 संशयित रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात गोवरचे 5 संशयित रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरात गोवरचे नव्याने 5 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच, हे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आठवडाभरात त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना गोवरची लागण झाली आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. शहरामध्ये गेल्या वर्षभरात 161 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळले होते. मात्र, सध्या या आजाराचे कुदळवाडी परिसरात केवळ संशयित रुग्ण आढळले आहेत. नव्याने बाधित रुग्ण आढळलेले नाही.

तथापि, याबाबत आवश्यक उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिका वैद्यकीय विभागातर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याशिवाय, लहान मुलांतील तापाचे रुग्ण तपासले जाणार आहे. चिखली-कुदळवाडी परिसरातही लहान मुलांना ताप असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यास अनुसरुन त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे.हा आजार होऊ नये यासाठी 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते. लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच महापालिका दवाखाना आणि रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या कालावधीत मोफत उपलब्ध आहे.

Back to top button