राहू बेट परिसरामध्ये ऊस तोडणीला वेग | पुढारी

राहू बेट परिसरामध्ये ऊस तोडणीला वेग

राहू; पुढारी वृत्तसेवा : दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीला वेग आला असल्याचे चित्र आहे. श्रीनाथ म्हस्कोबा, व्यंकटेश कृपा, दौंड शुगर, अनुराग शुगर या चार खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सध्या ऊस तोडणी सुरू आहे. कारखान्याकडून लवकर ऊस तोडणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी दराचा विचार न करता गुराळघरावरही ऊस गाळपासाठी दिलेला आहे. लवकरात लवकर ऊस तोडणी करून गव्हाची पेरणी अथवा कांदा लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा भर आहे.

मुळा- मुठा व भीमा नदीच्या पट्ट्यामुळे राहू बेट परिसर हा बारमाही बागायती परिसर असून राहू बेट परिसर उसाचे आगार समजला जातो. मध्यंतरीच्या पावसामुळे मंदावलेली ऊसतोडणी आता गती घेत आहे. पुरेशा प्रमाणात वाफसा आल्याने यंत्राद्वारे होणारी तोडणी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे कारखान्यांकडे आता पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत आहे.

ऑक्टोबर प्रारंभी जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ऊस तोडणीत मोठे अडथळे निर्माण झाले. अनेक ठिकाणी कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत नसल्याने या कालावधीत गाळप क्षमतेच्या 50 टक्केही ऊस कारखान्यांना येऊ शकला नाही. पाऊस थांबल्यानंतर ढगाळ हवामान काही दिवस राहिल्याने वाफसा अतिशय कूर्म गतीने येत होता. त्यामुळे कामगारांच्या मार्फत जेमतेम ऊसतोडणी सुरू होती. गेल्या काही दिवसांत मात्र ऊस पट्ट्यात समाधानकारक ऊन पडत आहे. उन्हाची तीव्रता फारशी नसली तरी वाफसा येण्यासाठी मोकळी हवा अनुकूल ठरत असल्याने तोडणीला वेग आला आहे.

अंदाज पाहून ऊस तोडणी गाडी सेंटरवर डोकी सेंटर यंत्रधारकांनी हळूहळू ऊस तोडणी सुरू केली आहे. जितक्या वेगात ऊस तोडणी शक्य होईल तितक्या वेगात ऊस तोडणी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे कारखाना वर्तुळातून सांगण्यात आले. एक डिसेंबरपासून भीमा पाटस या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होत असल्यामुळे ऊस तोडणीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होणार असल्याची एकंदर परिस्थिती आहे.

Back to top button