नायगाव : ऊस उत्पादकांच्या समस्या कायम | पुढारी

नायगाव : ऊस उत्पादकांच्या समस्या कायम

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात ऊसतोडणीपासून ते कारखान्यापर्यंत जाईपर्यंत शेतकर्‍यांना अनेक समस्या जाणवतात. शंकांचे वेळीच निरसन होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नेहमीप्रमाणे या वर्षीही पुरंदरमधील ऊस उत्पादकांच्या समस्या कायम राहतील, असेच दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील जवळार्जूनपासून ते सासवडपर्यंतच्या पट्ट्यात ऊसक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सन 2022 वर्षाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अद्याप या भागात ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झालेली नाही.

वेळेवर मजूर न मिळाल्याने ऊसतोडणी रखडल्याने वजनात घट होऊन नुकसानीला सामोरे जावे लागते. तसेच पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने धोकादायक परिस्थितीत उसाची वाहतूक करावी लागते. ऊसतोडणी वेळेवर होत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी पर्यायी कारखान्याची शोधाशोध शेतकर्‍यांना करावी लागते व अल्प दरात ऊस द्यावा लागतो. यावर्षी देखील याची पुनरावृत्ती होईल अशी परिस्थिती दिसून येत आहे.

मावडी सुपे (ता. पुरंदर) येथील एका शेतकर्‍याचा जानेवारी 2021 चा खोडवा नोंदीचा ऊस आजतागायत 20 महिने उलटून देखील तोडणी झालेला नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. ऊसतोडणीपासून ते कारखान्यापर्यंत पोहचेपर्यंत येणार्‍या सर्वच अडचणी वेळीच सोडविल्या जाव्यात, अशी मागणी पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button