खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवगंगा खोर्यातील शेतकरी दोन वर्षे कोरोना, नंतर अतिवृष्टी आणि आता टोमॅटोच्या पडत्या बाजारभावामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. टोमॅटोच्या एका जाळीला केवळ 50 ते 100 रुपये दर मिळत असून, परिसरात टोमॅटोवरील प्रक्रिया उद्योगांची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी टोमॅटोचे पंधरा ते सोळा तोडे होत असत. मात्र, सध्या जेमतेम पाच ते सहाच तोडे होत आहेत. बदलते हवामान हे याचे मुख्य कारण असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे टोमॅटोच्या एका जाळीला 50 ते 100 रुपये शेतकर्यांना मिळतात. एका जाळीत साधारण 25 ते 30 किलो टोमॅटो असतात. म्हणजे शेतकर्यांना एका किलोला दोन ते अडीच रुपये मिळतात. हेच टोमॅटो ग्राहक सुमारे 40 ते 50 रुपये किलोने खरेदी करतो. म्हणजेच मशेतकरी उपाशी आणि किरकोळ व्यापारी तुपाशीफ असे समीकरण पाहायला मिळत आहे.
दिवसेंदिवस डिझेलच्या किमती वाढल्या, परिणामी वाहतूक खर्च वाढला. पूर्वी एका जाळीला 15 रुपये भाडे असायचे. आता ते 25 रुपयांनी वाढून 40 रुपये झाली आहेत. वाढलेल्या रासायनिक, सेंद्रिय, खतांच्या किमती, कीटकनाशके, बुरशीनाशक खते यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्याप्रमाणात भाव गडगडलेले आहेत. त्यामुळे पिकाचा उत्पादनखर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटोचा फड लाल होऊनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या गोष्टींमुळे आम्ही टोमॅटो शेताच्या बांधावरच फेकून देत असल्याचे शिवरे (ता. भोर) येथील शेतकरी बाळासाहेब डिंबळे यांनी सांगितले.
खेड शिवापूर भागात हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. या हॉटेलमध्ये टोमॅटो सॉस, टोमॅटो प्युरी किंवा इतर भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. हे पदार्थ करून जर विक्री केली, तर त्याचा जास्त फायदा शेतकर्यांना होऊ शकतो. इतर पिकांचेही प्रक्रिया उद्योग केल्यास फायदाच आहे.
– दादासाहेब पवार, अध्यक्ष, नवविकास युवा शेतकरी संघटना.