बारामती; पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील शिक्षकांचे पगार निधीअभावी रखडले आहेत. दिवाळीपूर्वीचे पगार महिनाभरानंतर केले. पुणे जिल्ह्यात 3000 शिक्षकांना अद्याप दिवाळीचा पगार मिळाला नसल्याने संतापाची भावना असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. राज्य विधिमंडळातही याबाबत निर्णय झालेले आहेत.
शासनाने वेळेवर पगार होण्यासाठी सीएमपी प्रणाली सुरू केली, मात्र तरीही पगाराबाबतची दिरंगाई कमी होताना दिसत नाही. दर वर्षीप्रमाणे दिवाळीपूर्वी पगार करण्यास शिक्षण विभागास अपयश आले. दिवाळीनंतरही जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुक्यांचे पगार केले. मात्र, बारामती, खेड, दौंड या तीन तालुक्यांचे अनुदान कमी असल्याने पगार अद्याप केलेले नाहीत.
राज्य शासनाकडून तरतूद उपलब्ध होत नसल्याचे कारण जिल्हा परिषदेकडून दिले जात आहे. याउलट राज्याच्या शिक्षण संचालकांनी सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांना नोटीस बजावली असून, शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याबाबत खुलासा मागितला आहे. जिल्हा परिषदांनी सण अग्रीम, पुरवणी बिले यांसारख्या कारणासाठी वेतनाची रक्कम खर्च केल्याचे संचालक कार्यालयाचे मत आहे.
जिल्हा परिषद आणि शिक्षण संचालक कार्यालय यांच्या टोलवाटोलवीत शिक्षकांचा मात्र कोंडमारा झाला आहे. अनेक शिक्षकांची गृहकर्ज, बँका, पतसंस्थांचे हप्ते उशीर झाल्याने दंडव्याजाचा भुर्दंड भरावा लागत असल्याचे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी सांगितले.
पुढील महिन्यांतही अपुरा निधी
जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या पगारासाठी दरमहा 90 कोटींची गरज आहे. या महिन्यांत फक्त 55 कोटींचा निधी मिळाला. त्यातही मागील महिन्यातील 3 तालुक्यांचे पगार करावे लागणार असल्याने पुढील महिन्यात तब्बल 9 तालुक्यांतील शिक्षकांना पगाराची वाट पाहावी लागणार आहे.
राज्य सरकार व जिल्हा परिषदा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुरेशी तरतूद उपलब्ध होत नाही. शिक्षण विभागाचे हे अपयश असून, शिक्षकांना आता राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
– बाळासाहेब मारणे,
जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ, पुणे.