पुणे : डॉक्टर पत्नीचा अभियंता पतीकडून छळ | पुढारी

पुणे : डॉक्टर पत्नीचा अभियंता पतीकडून छळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विवाहानंतर तीन महिन्यांतच डॉक्टर पत्नीचा अभियंता असलेल्या पतीकडून छळ करण्यात आला. छळामुळे ती आई-वडिलांकडे राहत असताना पतीने तिची आणि तिच्या आईची समाजमाध्यमावर बदनामी केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अहमदनगर येथील अभियंता पतीवर आयटी अ‍ॅक्टसह कौटुंबिक छळाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणीचा जानेवारी 2021 मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून ते तीन महिनेच एकत्र राहिले. पती सातत्याने संशय घेत असल्याने ती माहेरी निघून गेली. त्यानंतर तो सातत्याने तिला मारून टाकण्याची धमकी देत होता. तसेच मैत्रिणींजवळ तिची बदनामी करीत होता.

दरम्यान, त्याने फिर्यादी आणि तिच्या आईचे समाज माध्यमावर बनावट खाते उघडले. दोघींची समाज माध्यमावर बदनामी सुरू केली. ही बाब फिर्यादीस कळताच तिने पोलिसांत धाव घेतली. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले, की दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात समझोता झाला नाही. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button