पुणे : कांदा, बटाटा प्रक्रिया प्रकल्पास सहकार्य : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल | पुढारी

पुणे : कांदा, बटाटा प्रक्रिया प्रकल्पास सहकार्य : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात बटाटा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. बटाटा पिकासाठी विमा योजना राबविण्यासाठी केंद्राकडून राज्याला कळविले जाईल. कांदा दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्राकडून निश्चित सहकार्य करू, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती व अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी गुरुवारी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते.

ते म्हणाले, या मतदारसंघात एकाच वेळी 38 जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांचे भूमिपूजन केले. जिल्ह्यातील 1600 जलजीवनच्या पाणी योजना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. त्यापैकी 158 मोठ्या योजना लवकरच पूर्ण केल्या जाणार आहेत. चाकणमधील जलजीवन अंतर्गत 16 गावांसाठी 158 कोटींची मोठी योजना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पदयात्रा काढा…
पटेल म्हणाले, ’मतदारसंघातील आदिवासी भागात केंद्राच्या योजना समजावणे, त्या कितपत पोहोचल्या याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना पायी यात्रा करण्यास सांगितले आहे. काही शक्ती आदिवासी बांधवांपर्यंत सरकारी योजना पोहोचू नयेत किंवा बिगर आदिवासी लोकांचा त्यांच्याशी संपर्कच होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात
येणार आहे.’

‘डॉ. कोल्हे काम करीत नाहीत’

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे काम करीत नाहीत. काम झाल्यानंतर मात्र श्रेय घेतात,’ अशी टीका प्रल्हादसिंह पटेल यांनी केली. कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागतच करू, असेही पटेल यांनी सांगितले. सांसद प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते. ते म्हणाले, की शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कधीच निवडणूक लढायची संधी मिळाली नाही. या मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. त्याकरिता संघटनात्मक पातळीवर जी कामे करायची आहेत, ती करीत आहोत. या ठिकाणी उमेदवार कोणत्या पक्षाचा, ते केंद्रीय पातळीवरून ठरेल. शिरूर जिंकण्यासाठी 2024 ची निवडणूक आम्ही लढवू.

Back to top button