पुणे : नायडू रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अपूर्ण | पुढारी

पुणे : नायडू रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम अपूर्ण

प्रज्ञा केळकर- सिंग

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षाचे वर्ग आणि प्रयोगशाळा नायडू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू होणार आहेत. तेथील काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या पथकाने अचानक भेट दिल्यास अपूर्ण कामामुळे परवानगीबाबत आक्षेप घेतला जाऊ शकतो.

महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालयाची केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यावर 7 मार्च रोजी 100 जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. सध्या कमला नेहरू रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या बाबूराव सणस शाळेमध्ये महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेवर दुसर्‍या वर्षाचे वर्ग भरणार आहेत. नायडू रुग्णालयाच्या दुसर्‍या वर्षासाठी पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्मकॉलॉजी, कम्युनिटी मेडिसीन आणि फोरेन्सिक मेडिसीन अशा पाच विषयांसाठी पाच प्रयोगशाळांची गरज भासणार आहे. याशिवाय वर्गखोल्यांची व्यवस्थाही करावी लागणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने अचानक भेट दिल्यास अपुर्‍या कामातील त्रुटी दाखवल्या जाऊ शकतात. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या भवितव्याबाबत महापालिकेला गांभीर्य कधी येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एनएमसीचे पथक पुण्यात दाखल झाले असून काही वैद्यकीय महाविद्यालयांना भेट देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या महाविद्यालयालाही लवकरच भेट दिली जाऊ शकते. पहिल्या वर्षाच्या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. त्यानंतर दोन- तीन आठवड्यांमध्ये निकाल लागून लगेच दुसर्‍या वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात होईल. तोपर्यंत काम न झाल्यास दुसर्‍या वर्षाच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बाबूराव सणस शाळेमध्ये अ‍ॅनॉटॉमी, फिजिऑलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या तीन विषयांच्या प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या आहेत. दुसर्‍या वर्षाचे वर्ग शाळेतील वर्गखोल्यांमध्ये भरवता येऊ शकतात. मात्र, प्रयोगशाळा नायडू रुग्णालयाच्या जागेत सुरू होतील. तेथील काम सध्या सुरू आहे.
                                                  डॉ. आशिष बंगिनवार,
                     अधिष्ठाता, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय

आम्ही नुकतीच नायडू रुग्णालयात सुरू असलेल्या कामाला भेट दिली. बांधकाम आणि विद्युत जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. फर्निचर, प्रयोगशाळांमधील साधनसामग्री यासाठी शुक्रवारी निविदा काढण्यात येणार आहे. ही निविदा अंदाजे 4 कोटी रुपयांची असेल. डिसेंबरअखेरपर्यंत नायडू रुग्णालयातील काम पूर्ण होईल.
                                                         रवींद्र बिनवडे,
                                            अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Back to top button