कार्ला : एकवीरादेवी मंदिर परिसरात उपोषण ; भाविकभक्तांसह ग्रामस्थांचा पाठिंबा | पुढारी

कार्ला : एकवीरादेवी मंदिर परिसरात उपोषण ; भाविकभक्तांसह ग्रामस्थांचा पाठिंबा

कार्ला : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मंदिर परिसर समस्याच्या विळख्यात सापडला आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून कोणतीही ठोस कृती होत नसल्याने या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व तत्काळ सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अशोक कुटे हे बेमुदत उपोषणाला बसले आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. खालील समस्या सोडविण्यासाठी तत्काळ संबंधित विभाग अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून निर्णय न घेतल्यास येत्या 23 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कुटे यांनी दिला होता. कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न झाल्याने दि. 23 पासून ते श्री आई एकवीरा मंदिर पायथा मंदिरासमोर ते उपोषणासाठी बसले आहे.

त्यांच्या या उपोषणाला वेहरगाव, कार्ला ग्रामस्त, भाविकभक्तांनी पाठिंबा दिला आहे. सर्व ग्रामस्थ कुटे यांंच्या पाठीशी असल्याचे वेहेरगाव ग्रामस्थांनी सांगितले. तसेच वेहेरगाव दहिवली ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी कुटे यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीबाबतच्या मागण्यांवर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

मागण्या खालीलप्रमाणे :

1 ) कार्लाफाटा ते एकवीरा देवी पायथा रस्त्याचे काम संथगतीने व निकृष्ट दर्जाचे, ते उत्तम दर्जाचे व तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.
2) एकवीरा देवी पायथा मंदिराजवळ असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागा कायमस्वरूपी वाहनतळासाठी द्यावी. (पे अँण्ड पार्क)
3) पायथा मंदिराच्या आसपास पाच पायरी मंदिर, गडावरील मुख्य मंदिर या ठिकाणी शौचालयांची संख्या वाढवावी व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
4) गड परिसरातील स्वच्छतेसाठी एकवीरा देवस्थान, वनविभाग, मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत यांना योग्य सूचना द्याव्यात.
5) गडाकडे जाणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येणार्‍या पायर्‍यांची डागडुजी करून पायर्‍यांच्या बाजूने पाण्याची, शौचालयाची, तसेच निवारा व्यवस्था करण्यात यावी.
6) पाच पायरी पार्किंगच्यालगत असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये वनउद्यानाची उभारणी करण्यात यावी.
7) पायथा मंदिरापाशी ऐतिहासिक तलावाचे तुटलेल्या कठड्यांची दुरुस्ती करून छोटेसे बालउद्यान उभारावे.

Back to top button