विदेशातील उच्च शिक्षणासाठी 127 विद्यार्थ्यांना मदतीचा हात | पुढारी

विदेशातील उच्च शिक्षणासाठी 127 विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विदेशातील उच्च शिक्षणासाठी महापालिकेने गेल्या दीड वर्षात 127 विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्यासाठी अर्थसाह्य म्हणून 1 कोटी 90 लाख 50 हजार रुपये इतका निधी देण्यात आला आहे. दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण करून विदेशात उच्च शिक्षण घेण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक आदींशी संबंधित शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य आदी शाखांतील शिक्षणासाठी देखील विदेशात जाण्यावर विद्यार्थी भर देत आहेत. महापालिकेकडून महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 2021-22 या वर्षात 71 विद्यार्थिनींना प्रत्येकी दीड लाख याप्रमाणे 1 कोटी 6 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले. तर, 2022-23 या वर्षात आत्तापर्यंत 43 विद्यार्थिनींना 64 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले आहे.

मागासवर्गीय मुलांच्या योजनेंतर्गत गेल्या वर्षात 7 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयाप्रमाणे 10 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसाह्य दिले. तर, चालू वर्षात आत्तापर्यंत 6 विद्यार्थ्यांना एकूण 9 लाख रुपये इतके अर्थसाह्य देण्यात आले आहे.

बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी 138 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या दीड वर्षात 138 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यामध्ये 74 मुलींना प्रत्येकी 25 हजार रुपयाप्रमाणे 18 लाख 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तर, 64 मागासवर्गीय मुलांना 16 लाख रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम देण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतरचे उच्च शिक्षण आणि विदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे अर्थसाह्य आणि शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या शिक्षणाला हातभार लागत आहे. चालू वर्षी ज्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचे आहे, त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने त्यांची सोय होणार आहे.
                             -सुहास बहाद्दरपुरे, समाज विकास अधिकारी, महापालिका.

31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती आणि विदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य या दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्यासाठी यापूर्वी 31 ऑक्टोबरअखेर मुदत देण्यात आली होती. या मुदतीत दोन महिने वाढ करण्यात आलेली आहे.
त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.

Back to top button