पिंपरी : सांगा आम्ही कुठं बसायचं? सरकारी कार्यालयात येणाऱ्यांसाठी किमान सुविधाही नाहीत | पुढारी

पिंपरी : सांगा आम्ही कुठं बसायचं? सरकारी कार्यालयात येणाऱ्यांसाठी किमान सुविधाही नाहीत

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात लोकांच्या सुविधेसाठी विविध सरकारी कार्यालये आहेत. कामानिमित्त या कार्यालयात वर्दळ असते. या कार्यालयांत विविध कामांसाठी सरकारी शुल्कदेखील आकारले जाते. त्यामुळे या कार्यालयात येणार्‍यांसाठी किमान सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे; मात्र याठिकाणी नागरिकांना बसण्यासही जागा नसते, तर काही ठिकाणी पिण्याचे पाणीही नसल्याची सद्यस्थिती आहे. ज्या नागरिकांकडून शासनाला महसूल मिळतो, त्यांना सुविधा देणे गरजेचे आहे, मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून, काही झाले तरी आम्ही सुधारणार नाही…! अशीच मानसिकता झाल्याचे एकंदरीत म्हणावे लागते.

भोसरीतील रेशनिंग कार्यालयात नागरिकांसाठी आसन व्यवस्थेचा अभाव

पिंपरी : एकीकडे रेशनिंग कार्यालय व रेशनिंग दुकानांना मानांकन देण्याचा उपक्रम सुरू केल्याने काही प्रमाणात रेशनिंग कार्यालयांचे रूपडे बदलत आहे; मात्र दुसरीकडे भोसरी रेशनिंग कार्यालय ‘हम नहीं सुधरेंगे’ अशा स्थितीत आहे. अतिशय अपुर्‍या जागेत रेशनिंग कार्यालयाचे कामकाज सुरू असून, कामासाठी आलेल्या नागरिकांना साधी बसण्याची व्यवस्था नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील रेशनिंग व्यवस्था चिंचवड झोन (परिमंडळ ‘अ’), पिंपरी झोन (परिमंडळ ‘ज’) व परिमंडळ‘फ’ अशा तीन विभागांत विभागली आहे. चिंचवड परिमंडळमध्ये 40 हजार 979 कार्डधारक असून, 1 लाख 62 हजार 151 लाभार्थी आहेत.

पिंपरी परिमंडळात 35 हजार 318 कार्डधारक असून, लाभार्थी 1 लाख 46 हजार 54 आहेत. भोसरी परिमंडळ विभागात कार्डसंख्या 41 हजार 527 असून, लाभार्थी 1 लाख 66 हजार 832 आहेत. शहरातील परिमंडळ कार्यालयातून हा कारभार हाकला जात आहे. या कार्यालयांमधून नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेवरील नाव वाढवणे, नाव कमी करणे, पत्ता बदलणे आदी कामकाज केले जाते.
एकीकडे मानांकनाच्या स्पर्धेमुळे रेशनिंग दुकानांचे व कार्यालयांचे रूपडे पालटले आहे. दुसरीकडे अन्नधान्य वितरण कार्यालय पुणेअंतर्गत परिमंडळ कार्यालय फ विभाग भोसरी कार्यालयाची मात्र अवस्था वाईट आहे.

नागरिकांना कामासाठी प्रतीक्षा…

भोसरी येथील रेशनिंग कार्यालय पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पांजरपोळ येथील ‘ई’ प्रभाग इमारतीत स्थित आहे. अतिशय अपुर्‍या जागेत रेशनिंग विभागाचे कामकाज सुरू आहे. कामासाठी आलेल्या लोकांना साधी बसण्याची व्यवस्था नाही. उभे राहूनच कामे करून घ्यावी लागतात. एकीकडे मानांकनाची भाषा करत असताना दुसरीकडे भोसरी रेशनिंग कार्यालयाची दुरवस्था हे विदारक चित्र आहे.

तहसील कार्यालयातही तीच परिस्थिती बसण्याची नाही जागा, पार्किंग व्यवस्थाही अपुरी

आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयात असलेले तहसील कार्यालय आता महापालिकेच्या फ प्रभाग इमारतीत निगडी येथे हलविण्यात आले आहे; मात्र या ठिकाणी विविध कामे घेऊन आलेल्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना साधी बसण्याची व्यवस्था नाही. पार्किंगही अपुरे पडत आहे.
निगडी टिळक चौकातील पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जुन्या इमारतीत हवेली दुय्यम निबंधक कार्यालय तहसील कार्यालय व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अशी तीन महत्त्वाची कार्यालय आहेत. या ठिकाणी पाणी व स्वच्छतागृह या सुविधा आहेत; मात्र तहसील कार्यालयात नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने उभे राहूनच कामे करून घ्यावी लागतात. तीन शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असल्याने उपलब्ध असलेले पार्किंग अतिशय अपुरे पडत आहेत. कर्मचार्‍यांची व अधिकार्‍यांची वाहने लावल्यानंतर इतरांची वाहने लावायला जागाच राहत नाही.

काम संथगतीने…
विविध प्रकारचे उत्पन्न दाखले ,अधिवास -रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, ऐपतीचा दाखला इत्यादी कारणांसाठी नागरिक तहसील कार्यालयात येत असतात; मात्र कामांना वेग नाही अन् कार्यालयात साधी बसण्याचीही व्यवस्था नाही, अशी कार्यालयाची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Back to top button