खोर-वाखारी रस्त्याचे काम निधीअभावी रखडले | पुढारी

खोर-वाखारी रस्त्याचे काम निधीअभावी रखडले

खोर; पुढारी वृत्तसेवा : खोर (ता. दौंड) येथील पाटलाचीवाडी-माने-पिसेवस्तीमार्गे वाखारी रस्त्याचे काम हे गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी रखडले गेले आहे. या कामासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करून रखडलेल्या कामाला गती देऊन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. खोर-पाटलाचीवाडीमार्गे वाखारी रस्ता हा खोरकडून चौफुला या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा असते.

या भागामधील शेतकर्‍यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी या रस्त्याच्या कामाला देण्यात आल्या आहेत. जवळपास 8.27 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, रस्त्याचे काम प्रगतिपथावर असताना निधीच्या कमतरतेमुळे हे काम गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी व प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने या कामासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी 85 लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून या कामाला निधीची उपलब्धता होत नसल्याने पुढील कामे कशी मार्गी लावावीत, असाच प्रश्न आहे.

                                                  – संजय जाधव, ठेकेदार, खोर-वाखारी रस्ता

Back to top button