उरुळी कांचनला गुन्हेगारांनी काढले पुन्हा डोके वर! | पुढारी

उरुळी कांचनला गुन्हेगारांनी काढले पुन्हा डोके वर!

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन परिसरात सराईत गुन्हेगारांनी गुन्हेगारी कारवाया करीत पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याबाबत पोलिसांना माहिती असूनही त्यांनी या गुन्हेगारांवर अंकुश लावला नसल्याने त्यांचे चांगलेच फावत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी कारवायांनी व गुन्हेगारांच्या उगमस्थानाने जिल्ह्याच्या पटलावर कायम केंद्रित असलेला उरुळी कांचन हा परिसर पुन्हा एकदा पिस्तुलाच्या ”खटक्याची भाषा” बोलू लागला आहे.

कारण, उरुळी कांचन परिसरात मागील काही दिवसांत नवीन दमाचे तरबेज गुन्हेगार मैदानात उतरले आहेत. ते परिसरातील अवैध धंदेचालक, रिक्षाचालक, पानटपरीधारक व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना टार्गेट करू लागले आहेत. मंगळवारी (दि. 22) एका मटका व्यावसायिकाला हत्यारे व पिस्तुलाच्या साह्याने धमकावून लुटण्याचा प्रयत्न झाला, तर यापूर्वीही अशाच एका घटनेत मटका व्यावसायिकाला हत्यारे लावून लुटण्याचा प्रयत्न सायंकाळच्या वेळेस घडला. यासह काही गुन्हेगारांनी पिस्तुलाचा धाक या ठिकाणी दाखविल्याची चर्चा आहे.

या गुन्हेगारी कारवाया कमी काय म्हणून परिसरात एका रिक्षाचालकाला हप्त्यासाठी एका ठिकाणी नेऊन गुन्हेगारांनी गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडला. या गुन्हेगारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या व्यक्तीला पुन्हा मारहाण करून मोबाईलवरील गुन्ह्याचे फुटेज डिलीट केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

गरिबांना तर न्यायच नाही?
उरुळी कांचन परिसरातील गुन्हेगारांनी सहाआसनी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या व्यक्तीला हप्त्यासाठी अमानुष मारहाण केली. हे गुन्हेगार मोकाट असून, पोलिस कारवाई करीत नसल्याने गरिबांना या ठिकाणी न्याय मिळत नाही, अशी अवस्था आहे. याउलट अवैध धंद्यांना खुलेआम मोकळे रान मिळत असून, या ठिकाणी वसुलीसाठी शहर पोलिसांची चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे. पुणे शहरात हा भाग समाविष्ट झाला खरा; परंतु गुन्हेगारांचा ”वळ गेला नाही ” अशी अवस्था परिसरात आहे.

Back to top button