पारगाव : काम नसल्याने शेतमजूर माघारी फिरण्याच्या तयारीत | पुढारी

पारगाव : काम नसल्याने शेतमजूर माघारी फिरण्याच्या तयारीत

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेतीकामांसाठी आलेल्या मावळ्यांच्या टोळ्यांमधील शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. हाताला कामे मिळत नसल्याने ते पुन्हा आपापल्या गावी जाण्याच्या तयारी आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षी दिवाळीच्या सणानंतर परिसरात खेड, आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतमजुरांच्या टोळ्या शेतीकामासाठी दाखल होतात. त्यानंतर बटाटे काढणीची कामे सुरू होतात.

मावळ्यांच्या टोळ्यांमधील शेतमजुरांना यामुळे चांगला रोजगार मिळतो. गहू खुरपणी, कांदा लागवडीची कामे मोठ्या प्रमाणावर याच परिसरात सुरू होतात. मावळ्यांच्या टोळ्या त्यामुळे या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याच परिसरात वास्तव्यास असतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात भंडारदरा, हिंगोली आदी परिसरातील शेतमजूरदेखील कामांसाठी येऊ लागले आहेत.

यंदा दिवाळीचा सणानंतर शेतमजुरांच्या टोळ्या या परिसरात दाखल झाल्या. बटाटा काढण्याची कामे यंदा लवकरच आटोपली. त्यामुळे आता शेती कामे नसल्याने या शेतमजुरांच्या हाताला काही काम मिळत नाही. गहू खुरपणी, कांदा लागवडी ही शेती कामे सुरू होण्यास अजून बराचसा कालावधी आहे. तोपर्यंत या परिसरात राहणे अशक्य असल्याने शेतमजूर आपापल्या गावी परतण्याच्या तयारीत आहेत.

Back to top button