पुणे : मैत्रिणीवरून तरुणावर कोयत्याने वार
पुणे; पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीच्या कारणातून दोघा तरुणांत झालेल्या वादातून एकाने दुसर्यावर कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी आलेल्या दुसर्या तरुणाला देखील धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले.
ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी बारा ते एकच्या सुमारास आझाद रेस्टॉरंट, आझम कॅम्पस मेन गेटजवळील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे एकत्र कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. आरोपीपैकी एकाने फिर्यादीच्या मैत्रिणीला घाणेरडे मेसेज केले होते. त्याचा जाब त्याने आरोपीला विचारून माफी मागण्यास सांगितले होते. दरम्यान, आरोपीने माफी मागितली नाही. त्या कारणातून फिर्यादी तरुणाने आरोपीला शिवीगाळ केली होती.
आरोपीने फिर्यादींना वाद मिटविण्यासाठी दुपारच्या वेळी बोलावून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात व हातावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हा सर्व प्रकार सुरू असताना, त्याला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या एका मित्राला देखील धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केली आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिली.
खुनाचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा
तू एका मुलीला फोन का करतोस, असे म्हणून शिवीगाळ करीत दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हितेश कांबळे (वय18, रा. मोहननगर धनकवडी) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुुसार दोघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तळजाई पठार (धनकवडी) परिसरात घडली.
बसमध्ये महिलेची रोकड चोरीला
पीएमपी बसने रामवाडी बस थांबा ते खराडी बायपास विमाननगर असा प्रवास करत असताना चोरट्यांनी मंगळवारी दुपारी एका महिलेच्या पर्समधून 48 हजार रुपयांची रोकड चोरली. हवेली येथील महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी गुन्हा
कोर्टाचे समन्स आलेल्या फाईलची मागणी करीत महिला पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका महिला पोलिस कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल घोले (वय 47, रा. दादर, मुंबई) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी शिवाजीनगर न्यायालय परिसरात झाली.

