असा नट होणे नाही…रंगभूमी अन् चित्रपट सृष्टीतील अभिनयाचे ‘सम्राट’, विक्रम गोखले यांचा जीवनप्रवास | पुढारी

असा नट होणे नाही...रंगभूमी अन् चित्रपट सृष्टीतील अभिनयाचे 'सम्राट', विक्रम गोखले यांचा जीवनप्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या बहुआयामी अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (वय 77) यांचे शनिवारी (दि. 26) दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला. गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्री, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी 70 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या. कुटुंबातूनच मिळालेल्या अभिनयाच्या वारसामुळे गोखले हेही अभिनय क्षेत्राकडे वळले आणि त्यांनी नाटकांसह चित्रपट आणि मालिकांचे जग गाजविले. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून आपला वेगळा ठसा उमटवला आणि त्यांच्या विविध भूमिकांनी त्यांनी वेगळी छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात उमटवली.

अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले, घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला आहे.

विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही
खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले
पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम आणि स्वामी

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट
मॅरेथॉन जिंदगी, आघात (2010 दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट)
आधारस्तंभ. आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत , ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर , दुसरी गोष्ट, दे दणादण, नटसम्राट, भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वर्‍हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके, सिद्धांत

विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट
अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, कैद में है बुलबुल, क्रोध, खुदा गवाह , घर आया मेरा परदेसी, चँपियन, जख़मों का हिसाब, जज़बात, जय बाबा अमरनाथ , तडीपार, तुम बिन, थोडासा रूमानी हो जाय, धरम संकट, परवाना , प्रेमबंधन, फलक द स्काय, बदमाश, बलवान, मुक्ता, यही है जिंदगी, याद रखेगी दुनिया, लाईफ पार्टनर, लाड़ला, वजीर, श्याम घनश्याम, सती नाग कन्या, सलीम लंगडे पे मत रो, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम, हसते हसते, हे राम,

दूरचित्रवाणी मालिका
अकबर बिरबल (दूरदर्शन-1990), अग्निहोत्र (स्टार प्रवाह), अल्पविराम, उडान (दूरदर्शन-1990-91), कुछ खोया कुछ पाया (दूरदर्शन), जीवनसाथी, द्विधाता, मेरा नाम करेगा रोशन, या सुखांनो या, विरुद्ध, संजीवनी, सिंहासन

पुरस्कार
’अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून), विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (2015), ‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार, हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (4-8-2017), पुलोत्सव सन्मान (डिसेंबर 2018), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

Back to top button