पुणे : यशस्वी यकृत प्रत्यारोपण करीत चिमुकलीला नवजीवन | पुढारी

पुणे : यशस्वी यकृत प्रत्यारोपण करीत चिमुकलीला नवजीवन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्रेया (नाव बदलले आहे) या 7 वर्षीय मुलीमध्ये यकृताशी संबंधित ’बिलियरी अ‍ॅट्रेशिया’ या दुर्मीळ
आजाराचे निदान झाले. दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मनोज श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील टीमने तिच्याशी यशस्वी यकृत प्रत्यारोपण करीत तिला नवजीवन मिळवून दिले. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विष्णू बिरादार म्हणाले, ’श्रेया 5 वर्षांची असताना तिचे पालक कावीळ, अशक्तपणा या तक्रारी घेऊन आमच्याकडे आले होते. तिच्या तपासण्या केल्यावर प्लेटलेट आणि अल्ब्युमिनची कमी पातळी, अशी अनेक प्रकारची गुंतागुंत असल्याचे निदान झाले.

त्यामुळे तिची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असल्याने तो पर्याय पालकांपुढे ठेवण्यात आला होता. त्यांनी संमती दिल्याने यकृतदाता उपलब्ध होताच रुग्णालयाच्या टीमने शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केली. टीममध्ये डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ. गुरुप्रसाद शेट्टी, डॉ. एस. एस. भालेराव आणि डॉ. अमोल जाधव, डॉ. भाग्यश्री आणि डॉ. अमित भार्गव यांचा समावेश होता.

रक्तवाहिन्या आणि पित्तनलिका यांचा लहान आकार आणि इतर गुंतागुंत, यामुळे शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. शस्त्रक्रिया 8 तास चालली. अनुभवी डॉक्टरांनी आव्हाने कार्यक्षमतेने हाताळली.
                                                 – डॉ. मनोज श्रीवास्तव, हेड ट्रान्सप्लांट सर्जन

अलीकडेच आम्ही 16 वर्षांहून कमी वयाच्या 25 पेक्षा जास्त रुग्णांमध्ये यकृत प्रत्यारोपण पूर्ण केले आहे. यकृत प्रत्यारोपणानंतर मुलगी कोणत्याही समस्यांशिवाय सामान्य जीवन जगू शकेल.
                                             – डॉ. राजेंद्र पाटणकर, सीईओ, ज्युपिटर हॉस्पिटल

Back to top button