कात्रज दूध संघाचे पाच कर्मचारी निलंबित | पुढारी

कात्रज दूध संघाचे पाच कर्मचारी निलंबित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीतील म्हशीच्या दुधाची फॅट वाढ करण्याच्या ‘सॅम्पल टेस्टिंग’ घोटाळ्यावरून संचालकांमध्ये वादंग झाले. अखेर प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या संबंधित पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. असे असले तरी घोटाळेबाज कोणाच्या सांगण्यावरून ‘कात्रज ब्रॅण्ड’ला अडचणीत आणत होते, याबद्दलची सखोल चौकशी होणार किंवा कसे? अशा चौकशी नियुक्तीबाबत संचालक मंडळाने तोंडावर बोट ठेवल्याने याबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

कात्रज दुग्धालयात बुधवारी (दि. 23) संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये खेडमधील पाईट केंद्रावरील म्हैस दुधाची कमी फॅट असताना ती जादा दाखवून झालेल्या सॅम्पल घोटाळ्यावर संबंधित नऊ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि त्यांच्याकडून 48 तासांच्या आत खुलासाही सादर करण्यात आला होता. त्यावर बैठकीत घमासान चर्चा होऊन जुन्या आणि संचालक मंडळावर नव्याने निवडून आलेल्या संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत वादंग वाढले.

कात्रज डेअरीमधील संचालक मंडळाच्या बैठकीत संबंधित कर्मचार्‍यांनी दिलेल्या खुलाशावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. संचालक मंडळाने या घटनेत प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, या दुधाच्या फॅट वाढीतील प्रकरणातील संबंधित ठेकेदार मजुरास तत्काळ काढून टाकण्यात आल्याची माहिती संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. तसेच इतर सेवकांच्या बदल्या करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, या कारवाईतील कर्मचार्‍यांची नावे त्यांनी कळविलेली नाहीत. अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

अशी आहेत नावे…
दूध सॅम्पल टेस्टिंग घोटाळ्यातील प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने या घोटाळ्यात निलंबनाची कारवाई करण्यात आलेले कात्रज मुख्यालयातील तीन कर्मचार्‍यांमध्ये केमिस्ट विकास भुजंगे, केमिस्ट प्रमोद काळे आणि कात्रज दूध संकलन विभागाचे प्रमुख संदीप खाडे आणि खेडमधील पाईट येथील प्रमुख शांताराम सावंत आणि केमिस्ट ज्ञानेश्वर डोंगरे यांचा समावेश असल्याची माहिती प्रथमच निवडून आलेल्या एका संचालकाने दिली.

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचीही कसोटी
संचालक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे बर्‍याच वेळ उपस्थित राहिल्याने काही संचालकांनी बैठकीनंतर ’पुढारी’ शी बोलताना नाराजी व्यक्त केली. एवढेच नाहीतर आरोप-प्रत्यारोपावरून संचालकांमधील वादंग वाढत असताना त्यांनी हस्तक्षेप करूनही कोणीच ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे कात्रजप्रश्नी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बैठक घ्यावी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

Back to top button