पुणे : अधिसभेच्या उर्वरित दोन जागांचा निकाल जाहीर | पुढारी

पुणे : अधिसभेच्या उर्वरित दोन जागांचा निकाल जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील आठ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला, तर उर्वरित दोन खुल्या प्रवर्गांतील जागांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत 9 जागा विद्यापीठ विकास मंचला, तर केवळ एक जागा ‘सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल’ला मिळविता आली. त्यामुळे या निवडणुकीत ‘सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल’चा दारुण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले.

विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात होते. यातील आठ जागांचा निकाल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. विशेष म्हणजे, या आठही जागांवर विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचे दिसून आले. उर्वरित दोन जागांमध्ये खुल्या प्रवर्गातून विद्यापीठ विकास मंचच्या दादाभाऊ शिनलकर यांनी 2 हजार 511 मते मिळवत विजय मिळविला, तर सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे एकमेव उमेदवार बाकेराव बस्ते 2 हजार 230 मते मिळवत विजयी झाले.

त्यामुळे विद्यापीठ विकास मंचला 9 जागांवर, तर सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलला केवळ एका जागेवर विजय मिळविता आल्याचे दिसून आले. विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल या परस्परविरोधी पक्षांमध्ये हा सामना अटीतटीचा झाल्याने मतमोजणीच्या सोळा फेर्‍या पार पडल्या. खुल्या प्रवर्गातील दोन जागा वगळता उर्वरित प्रवर्गांचे निकाल मंगळवारी रात्री 11 वाजेपर्यंत जाहीर झाले. राहिलेल्या दोन जागांसाठी मात्र बुधवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती.

विद्यापीठ विकास मंचचे विजयी उमेदवार
प खुला गट : 1) प्रसेनजित श्रीकृष्णा फडणवीस; 2) सागर अनिल वैद्य; 3) युवराज माधवराव नरवडे; 4) दादाभाऊ भिकाजी शिनलकर; प एससी प्रवर्ग : 5) राहुल शिवाजी पाखरे; प डीटीएनटी प्रवर्ग : 6) विजय निवृत्ती सोनवणे; प ओबीसी प्रवर्ग : 7) सचिन शिवाजी गोर्डे; प एसटी प्रवर्ग : 8) गणपत पोपट नांगरे; प महिला गट : 9) बागेश्री मिलिंद मंठाळकर

मतमोजणीसाठी तब्बल 20 तास
मतमोजणी 22 नोव्हेंबरला सकाळी 8.30 वाजता सुरू झाली, तर 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता संपली. त्यामुळे मतमोजणी पूर्ण होण्यासाठी तब्बल वीस तास लागल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button