कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत आता रंब्लर | पुढारी

कात्रज नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत आता रंब्लर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज नवीन बोगद्यापासूनच पुण्याकडे येणार्‍या वाहनांचा वेग तीव्र उतारामुळे प्रचंड असतो. हा वेग कमी करण्यासाठी नवीन बोगद्यापासून 300 ते 350 मीटर अंतरावर रंब्लर लावण्यात येणार आहेत. तसेच, ज्या ठिकाणी हे रंब्लर आता 4 इंचांचे आहेत, त्या ठिकाणी 10 ते 12 इंच उंचीचे करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. नवले पूल परिसरात सातत्याने होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय यंत्रणांची बैठक पार पडली.

त्यामध्ये प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली किंवा कसे, हे पाहण्यासाठी विभागीय आयुक्त राव यांनी नवले पूल परिसराची बुधवारी (दि. 23) अचानक पाहणी केली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता या वेळी उपस्थित होते. या भेटीत स्थानिक नागरिक, ट्रकचालक यांच्याशी देखील संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या.

आणखी स्पीडगन बसविणार…
‘एनएचएआय’कडून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये वाहनांचे वेग तपासण्यासाठी कॅमेरे (स्पीडगन) बसविण्यात आले आहेत. तसेच, सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आणखी काही ठिकाणी कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे सांगितले, त्यानुसार येथे आणखी वेग तपासणी कॅमेरे बसविले जातील. तसेच, सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे महापालिका आणि पोलिसांकडून काढण्यात येत आहेत, असे राव यांनी या वेळी सांगितले.

Back to top button