पुणे : नवले, भूमकर पुलावर मलमपट्टी; अपघातानंतर कायमस्वरूपी उपाययोजनांकडे दुर्लक्ष | पुढारी

पुणे : नवले, भूमकर पुलावर मलमपट्टी; अपघातानंतर कायमस्वरूपी उपाययोजनांकडे दुर्लक्ष

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवले पूल परिसरात झालेल्या मोठ्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बुधवारी त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असताना प्रशासन पातळीवर पुन्हा तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय केले जात असल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

गेल्या अनेक वर्षांत नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. त्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला. लाखो रुपयांच्या वाहनांचे नुकसान झाले. मात्र, प्रशासन नेहमीप्रमाणे तात्पुरत्या उपाययोजना करते आणि नंतर विसरून जाते. हे नेहमीचेच झाले आहे. बुधवारी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने भूमकर पुलाजवळ तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करण्यात येत होती.

कंटेनरची कारला धडक
नवले पूल परिसरातील भूमकर चौक येथे बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी पुन्हा अपघात झाला. परंतु, दुपारच्या सुमारास झालेला हा अपघात किरकोळ स्वरूपाचा होता. एका कंटेनरने एका इर्टिगा कारला मागून धडक दिली. सुदैवाने कंटेनरचा वेग कमी असल्याने कारचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र, कारचालक आणि ट्रकचालक यांचा जोरदार वाद झाला.

नुसतीच अतिक्रमण हटाव कारवाई काय कामाची?
अपघातानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यावर भर दिला. मंगळवारी येथील हॉटेल, पानटपर्‍या, छोटी-मोठी दुकाने पाडली अन् दुर्लक्ष केले. हीच दुकाने पुन्हा काही दिवसांनी पुन्हा उभी राहतील. त्यामुळे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव कारवाईचा फायदाच होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करून रस्ता बांधण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे.

क्रॅश बॅरिअरची लांबी वाढविली
नर्‍हे गावातून महामार्गावर होणारी वाहनांची घुसखोरी कायमची थांबल्याशिवाय येथील अपघात थांबणार नाहीत. तरीही प्रशासन येथील वाहनांची घुसखोरी तशीच ठेवून येथील क्रॅश बॅरिअरची लांबी वाढवून फक्त मलमपट्टी करीत आहे. येथील मार्गच बंद करण्याची सध्या गरज आहे. त्याशिवाय अपघात थांबणार नाहीत.

जुन्या रंब्लरलाच करताहेत पांढर्‍या रंगाची मलमपट्टी…
नवीन बोगद्यापासून येणार्‍या वाहनांचा वेग खूपच जास्त असतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने नव्या बोगद्यापासूनच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, भूमकर चौकात असलेल्या पिवळ्या रंगाच्या रंब्लरवर फक्त पांढरा रंग लावून मलमपट्टी करण्यात आली. याशिवाय कोठेही आयआरसी कोडप्रमाणे स्पीडब—ेकर लावण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनांचा वेग काही केल्या कमी होणार नसल्याचे दिसत आहे.

महामार्गावर मोठे कंटेनर सुसाट…
महामार्गावर दिवसा मोठे कंटेनर, ओव्हरलोड वाहनांना बंदी आहे. असे असताना देखील बुधवारी हे कंटेनर सुसाट धावताना दिसत होते. प्रशासनाने अशा ओव्हरलोड वाहनांना आणि खासकरून कंटेनरला दिवसा महामार्गावर धावण्यास बंदी करावी. रात्री 12 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी द्यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Back to top button