बारामतीत 18 पालकांवर पोलिसांनी दाखल केले खटले, अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे भोवले | पुढारी

बारामतीत 18 पालकांवर पोलिसांनी दाखल केले खटले, अल्पवयीन मुलांना दुचाकी देणे भोवले

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरात अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणे पालकांना चांगलेच भोवले आहे. शहर पोलिसांनी 18 पालकांविरोधात खटले दाखल करीत ते न्यायालयासमोर सादर केले आहेत. बारामती शहरात अल्पवयीनांच्या हाती दुचाकी देण्याचे प्रमाण मोठे आहे. ही महाविद्यालयीन तरुण मंडळी अत्यंत बेदरकारपणे दुचाकी चालवतात. शाळा-महाविद्यालयांत बिनदिक्कतपणे दुचाकी घेऊन येतात. दुचाकीवरून दोनपेक्षा अधिक जण बसतात. कर्णकर्कश हॉर्न वाजवला जातो. सायलेंसरचा मोठा आवाज काढला जातो. पोलिसांकडून अशा तरुणांवर सातत्याने कारवाई होत असली, तरी हे प्रमाण अद्याप कमी व्हायला तयार नाही. पालकांचा अल्पवयीन पाल्यांवर वचक राहिलेला नाही.

अल्पवयीनांच्या हाती वाहन दिल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. या तरतुदीचा अवलंब करीत गेल्या दोन दिवसांत बारामती शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने 18 पालकांवर खटले दाखल केले. हे खटले न्यायालयापुढे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

Back to top button