हिंजवडी : गायरान जागेसाठी ग्रामस्थांच्या फेर्‍या, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू | पुढारी

हिंजवडी : गायरान जागेसाठी ग्रामस्थांच्या फेर्‍या, अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

हिंजवडी, पुढारी वृत्तसेवा: गायरान जमिनीवरील अतिक्रमण हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा दुर्लक्षित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. त्यादृष्टीने तालुका पातळीवर जुने रेकॉर्ड तपासणीचे कामकाज सुरू झाले असल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे हिंजवडीसह जिल्ह्यातील गायरान जमिनीवर घर बांधून वास्तव्य करणार्‍या नागरिकांची आता मोठ्या प्रमाणत धावाधाव होत आहे. आमदार, खासदार, अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. आता यावर काय मार्ग काढला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यातील गायरान जमिनीवर व्यापक अतिक्रमण झाल्याची बाब समोर आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमिनीवर किती अतिक्रमण आहे, याची माहिती गोळा केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातही याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायत निहाय गायरान जमिनीची यादी तयार करून संबंधित अचूक माहिती अतिक्रमण संकलनाचे प्रयत्न सुरू करून माहिती संकलित केली जात आहे. प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांना नोटीस पाठविण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीलाच करावी लागणार आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यापासून ते अतिक्रमण निष्कासित करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने ग्रामविकास विभागालादेखील मोहिमेत सहभागी व्हावे लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गायरान जमिनींवर अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याचे आढळून आले आहे. त्यावर आता ठोस उपाययोजना करणे अपेक्षित असल्याने महत्त्वपूर्ण, यासाठी एक समितीदेखील स्थापन केली जाणार आहे.

गायरान जमिनीवर मागील काळात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण झाले आहे. मोठमोठ्या इमारती यावर उभारण्यात आल्या आहेत. तसेच मागील अनेक वर्षांत शासनाची गायरान अतिक्रमणाबाबतची भूमिकादेखील संभ्रम निर्माण करणारी आहे.

देवस्थान जागेसाठी प्रयत्न

हिंजवडी येथील गायरान जमिनीतील मोठा भाग हा आयटी पार्क हिंजवडीसाठी देण्यात आला आहे. उर्वरित गायरान जमिनीवर म्हाडा, हिंजवडी येथील आराध्य दैवत म्हातोबा देवस्थान आणि इतर अतिक्रमण अशी वर्गवारी केली जात आहे. ग्रामस्थ आणि नागरिक आता देवस्थानसाठी राखीव असलेल्या 30 एकर जागेची मागणी प्रथम करीत आहेत.

Back to top button