आळंदी, पुढारी वृत्तसेवा: आपल्या मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्म शिक्षण दिले तर त्या लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत, असे वक्तव्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी आळंदीत केले.
राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूधर्मरक्षणार्थ वारकरी महाधिवेशनात स्वामी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. रामकृष्णदासजी महाराज, लहवितकरी महाराज, योगीदत्तनाथ महाराज, ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज तुनतूने शास्त्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, मिलिंद एकबोटे, विजय वरुडकर, ह.भ. प. निरंजन शास्त्री कोठेकर व मोठ्या संख्येने वारकरी, समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक व मान्यवर उपस्थित होते.
राज्यात धर्मांतर बंदी व लवजिहाद विरोधी कायदा असावा, स्त्रियांकडून संस्कार अपेक्षित आहेत, आपली मुलगी कुठे जाते? काय करते? कोणाशी बोलते, मिस कॉल कोणाचा आला, तिचा मित्र तरी कोण आहे याची निदान चौकशी तरी आपण करायला पाहिजे. मुक्तता याचा अर्थ स्वैराचार नाही, मुक्तता म्हणजे तुम्ही तुमचे शिक्षण घ्या. पण अधार्मिक मार्गावर पावले टाकू नका, असेही अमृताश्रम स्वामी महाराज यांनी बोलताना मत व्यक्त केले.