पिंपरी: तिकीटशुल्क तरीही पालिकेची उद्याने फुल! | पुढारी

पिंपरी: तिकीटशुल्क तरीही पालिकेची उद्याने फुल!

मिलिंद कांबळे

पिंपरी: महापालिकेचे शहरात तब्बल 159 सार्वजनिक उद्याने आहेत. उद्याने वेगवेगळ्या संकल्पनेनुसार आकर्षक पद्धतीने सुशोभीत करण्यात आली आहेत. नागरिक त्यांचा सहकुटुंब आनंद घेत आहेत. नव्याने सुशोभित व विकसित केलेल्या आठ उद्यानांना तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सुमारे 4 महिन्यांपूर्वी प्रवेशशुल्क लागू केले. सुरुवातीला त्याला विरोध झाला; मात्र तिकीट असूनही, नागरिकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून तो विरोध काही दिवसांत मावळला.

तिकीट काढून उद्यानात फिरण्यास येणार्‍या नागरिकांची संख्या कमी न होता ती दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांना आपल्या कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाइकांसह उद्यानाचा मनमुराद आनंद घेत आहेत. तिकिटामुळे नाहक होणारी गर्दीस आळा बसला आहे. तसेच, उद्यानात नियम पाळण्यावर भर दिला जात आहे. तिकीट काढल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याने टवाळखोर तसेच, भिकार्‍यांचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

वीस, दहा, पाच रुपये प्रवेश तिकीट

दुबईच्या धर्तीवर विकसित केलेले पिंपळे गुरवचे राजमाता जिजाऊ (डायनोसर) उद्यान, जागतिक उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले दोन मजली पूर्णानगरातील अटल बिहारी वाजपेयी उद्यान आणि खाणीतील तलावाभोवतीचे संभाजीनगरचे बर्ड व्हॅली (लेझर शोसह) या उद्यानात प्रौढांना 20 रुपये व बालकांना 10 रुपये तिकीट आहे. तर, निगडीतील दुर्गादेवी टेकडी उद्यान, भोसरीतील सहल केंद्र, प्राधिकरणातील गणेश तलाव-सावरकर उद्यान आणि वाकडमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात प्रौढांना 10 रुपये व बालकांना 5 रुपये तिकीट आहे. गुजरनगर, थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात प्रौढासाठी 2 व बालकांसाठी 1 रुपया असे नाममात्र तिकीट आहे.

तिकीट विक्रीच्या उत्पन्नातून उद्यानावरच खर्च

उद्यानात आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने विजेचा खर्च वाढला आहे. उद्यानांची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, माळी काम, दुरुस्ती तसेच, शोभिवंत रोपे लावणे आदी नियमित खर्च आहे. तिकीट विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून उद्यानांचा खर्च भागविण्यास सहाय होत आहे. नागरिकांना चांगली सुविधा मिळत असून, ते उद्यानांच्या सुविधेचा लाभ घेत आहेत. नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक गोरख गोसावी यांनी सांगितले.

भोसरी सहल केंद्रास महिन्याभरात 4,870 जणांची भेट

सर्वाधिक पसंती भोसरीतील सहल केंद्रास मिळत आहे. तेथे ऑक्टोबर महिन्यातील 31 दिवसांत सर्वाधिक 4 हजार 870 नागरिकांनी भेट दिली. तर, निगडीच्या दुर्गादेवी उद्यानाचा 3 हजार 540 नागरिकांनी आनंद घेतला. तिकीट विक्रीतून सर्वाधिक 54 हजार 600 रुपयांचे उत्पन्न पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानातून मिळाले. पूर्णानगरच्या वाजपेयी उद्यानातून 52 हजार 20 रुपये पालिका तिजोरीत जमा झाले. तसेच, उद्यानातील छायाचित्रीकरणाच्या शुल्कातून 1 हजार 250 रुपये जमा झाले आहेत.

नागरिकांच्या या आहेत अपेक्षा

  1. उद्यानात स्वच्छता राखली जावी.
  2. ओपन जीम, खेळण्याची दररोज साफसफाई व्हावी.
  3. उद्यानाची वेळ वाढवावी.
  4. लहान मुलांसाठी खेळणीची संख्या अधिक हवी.
  5. अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांना उद्यानात प्रवेश देऊ नये.
  6. स्वच्छतागृहाची सुविधा चांगली हवी.
  7. पिण्याचे पाणी उपलब्ध हवे.
  8. पार्किंगची सुविधा प्रशस्त हवी.
  9. उद्यानाबाहेरील खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला असावा.

Back to top button