माणिक पवार :
एखाद्या गुन्ह्याच्या तपासकामी इतर ठिकाणी पोलिस कर्मचार्याला पाठविले जाते, तर कार्यालयीन काम करण्यासाठी पुरेशा वेळेअभावी येण्या-जाण्यामध्ये दगदग वाढत असते, तर आपत्कालीन ठिकाणी संदेश मिळाल्यानंतर तातडीने जावे लागते. वेळप्रसंगी तेथे श्रम करून उपाययोजना करावी लागते. अशावेळी वरिष्ठांची नाराजी सांभाळून सेवा करावी लागते. काही वेळा पोलिस जर चुकला, तर त्याच्या कामाजी नोंद तत्काळ स्टेशन डायरीला रजिस्टर केली जाते. मात्र, एखादे चांगले काम केले तरी, त्या कामाची दखल रिटायर झाले तरी घेतली जात नसल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत की, तिथे अजूनही वीज पोहचली नाही. अशा ठिकाणी पोलिस कर्मचारी काम करीत असतात. अनेक पोलिस ठाण्यांत राहण्यासाठी वसाहत नसते. लांब पल्ल्यातून प्रवास करीत चौकी-ठाणे गाठावे लागते. गुन्हेगाराकडे अत्याधुनिक शस्त्रे आली आहेत. पोलिस अधिकार्यांकडे काही अत्याधुनिक शस्त्रे जरी असली, तरी बहुतांश इंग्रजकालीन व सुमारे 1950 पासूनच्या बनावटीची शस्त्रे वापरावी लागत आहेत. मात्र, पोलिस कर्मचार्यांना अत्याधुनिक शस्त्रे मिळावीत, अशी मागणी पोलिस कर्मचार्यांकडून होत आहे.
हाताची सर्व बोटे एकसारखी नसतात, ही वस्तुस्थिती सर्वच क्षेत्रांत पाहावयास मिळत असते. पोलिस खात्यातील काही जण चुकीचे वागतात. मात्र, त्याचा परिणाम म्हणून सर्व पोलिसांविषयी जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. चांगल्या पोलिसांना समाजाने स्वीकारले पाहिजे. बदलत्या प्रक्रियेमुळे होणारी ससेहोलपट, या एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात पोलिस कर्मचारी भरडला जात आहे. शासनाने व गृह खात्याने यावर वेळीच ठोस पावले उचलून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. तरच, भावी पिढीचा पोलिस क्षेत्रात येण्यासाठी विश्वास कायम राहील.